सिरोंचा ग्रामीण रुग्णालय नेहमीच चर्चेत का?
कधी जीर्ण इमारतीचा प्रश्न, कधी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; आरोग्य व्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये नाराजी
सिरोंचा (प्रतिनिधी) : सिरोंचा ग्रामीण रुग्णालय गेल्या काही काळापासून विविध कारणांमुळे सातत्याने चर्चेत येत आहे. कधी रुग्णालयाच्या जीर्ण इमारतीचा प्रश्न, तर कधी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कथित कार्यपद्धतीबाबत नागरिकांकडून तक्रारी समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी रंगायफली येथील पाच वर्षीय बालकाच्या मृत्यूचे प्रकरण चर्चेत आले होते. या पार्श्वभूमीवर सिरोंचा ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत असून, नेमके सिरोंचा ग्रामीण रुग्णालय वारंवार चर्चेत का येते? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
रुग्णालयातील आरोग्यसेवा, उपलब्ध सुविधा, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती तसेच रुग्णांना मिळणाऱ्या उपचारांबाबत प्रशासनाने गांभीर्याने आढावा घेण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
साध्या आजारांवरील रुग्णांनाही ग्रामीण रुग्णालयातून बाहेर रेफर केले जात असल्याने गोरगरीब रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. स्थानिक पातळीवर उपलब्ध होऊ शकणारे उपचारही बाहेर घ्यावे लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रामीण रुग्णालयातील आरोग्यसेवा सुरळीत करावी, रुग्णांच्या तक्रारींची दखल घ्यावी तसेच संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी, या मागणीसाठी सोमवारी नागरिकांनी जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्या नावे तहसीलदार, सिरोंचा यांच्यामार्फत निवेदन सादर केले.
सामाजिक कार्यकर्ते सय्यद सलाम भाई यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. ग्रामीण रुग्णालय हे सिरोंचा तालुक्यातील तसेच दुर्गम भागातील गोरगरीब नागरिकांसाठी महत्त्वाचे आरोग्य केंद्र आहे. मात्र, येथे पुरेशा सुविधा आणि अपेक्षित उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी वारंवार होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
रुग्णालयाच्या कारभारावर प्रशासनाचे लक्ष जाणार का?
ग्रामीण रुग्णालयाशी संबंधित विविध तक्रारी सातत्याने समोर येत असताना प्रशासनाकडून या समस्यांचा कायमस्वरूपी तोडगा कधी काढला जाणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. रुग्णालयाची इमारत, आरोग्य सुविधा, मनुष्यबळ, अधिकारी-कर्मचाऱ्यांची कार्यपद्धती आणि रुग्णसेवा या सर्व बाबींचा एकत्रित आढावा घेऊन आवश्यक सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दहा दिवसांचा अल्टिमेटम; उपोषणाचा इशारा
निवेदनावर दहा दिवसांच्या आत योग्य ती कार्यवाही न झाल्यास उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. तसेच सिरोंचा तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न राज्य सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
यावेळी नगरपंचायतीचे नगरसेवक रणजीत गागापुरपू, नरेश अलोने, तसेच इम्तियाज खान, अफरोज सैय्यद, सिद्दिक भाई, रमेश बत्तूला, सुरेश पडीगेला, तौसिफ खान, शाहरुख शेख, रमेश तोकला, पत्रकार एम.डी. इरफान, जाकीर अली, बबलू खान, श्रीकांत शृंगारवार, नारायण शनिगारापू यांच्यासह दुर्गम भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आता प्रशासन या तक्रारींची कितपत गांभीर्याने दखल घेते आणि सिरोंचा ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी कोणती ठोस पावले उचलते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
