आलापल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेसची जोरदार बैठक; स्मार्ट मीटरविरोधात आक्रमक भूमिका!
अवाजवी वीजबिल, मीटर रीडिंगचा गोंधळ आणि रखडलेल्या आलापल्ली–सिरोंचा महामार्गावर पदाधिकाऱ्यांची संतप्त चर्चा
आलापल्ली : Tirupati Madavi
आलापल्ली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात रविवार, ३० ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)ची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा तथा गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
स्मार्ट मीटरचा वाढता विरोध, अवाजवी वीजबिलांचा प्रश्न आणि आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले बांधकाम या प्रमुख मुद्द्यांवर बैठकीत पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका मांडली.
नवीन स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य ग्राहकांवर आर्थिक भार पडत असल्याचा मुद्दा उपस्थित करताना, स्मार्ट मीटर सक्तीने लादू नयेत, अशी ठाम भूमिका बैठकीत मांडण्यात आली. त्याचबरोबर जुन्या वीज मीटरचे नियमित रीडिंग न घेता ग्राहकांना वाढीव वीजबिले दिली जात असल्याच्या तक्रारींवरही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
आलापल्ली–सिरोंचा महामार्गाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाचा प्रश्न बैठकीत ऐरणीवर आणण्यात आला. या महत्त्वाच्या मार्गाचे काम तातडीने पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला हा मार्ग वारंवार रखडत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
याशिवाय मतदारसंघातील विविध रेंगाळलेली विकासकामे, नागरिकांच्या मूलभूत समस्या आणि प्रशासनाकडे प्रलंबित असलेले प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी पुढील काळात ठोस पाठपुरावा करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती
बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते श्रीकांत मद्दीवार, ज्येष्ठ नेत्या पुष्पाताई अलोणे, अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, तालुकाध्यक्ष नागेश मडावी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष इरफान शेख, सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोणे, जिल्हा महासचिव बालाजी गावडे, महिला तालुकाध्यक्षा सारिका गडपल्लीवार, शहराध्यक्षा श्रीशा कुडकावार, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अहेरी तालुकाध्यक्षा प्रणाली दुर्गे यांच्यासह आलापल्ली ग्रामपंचायत सदस्य मनोज बल्लूवार, संतोष अर्का, भाग्यश्री बेझलवार, नागेश करमे, सलीम शेख, वासुदेव पेद्दीवार, चंदू बेझलवार, जाफर अली, संदीप ढोलगे, पितांबर कुळमेथे, श्रीनिवास गचार्लावार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
जनतेच्या प्रश्नांवर केवळ चर्चा न करता त्यासाठी आक्रमकपणे पाठपुरावा करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
