📚 भामरागड आश्रमशाळेत उत्साहात शिक्षक दिन साजरा
विद्यार्थ्यांनी साकारल्या शिक्षकांच्या भूमिका; उत्कृष्ट शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांची निवड
प्रतिनिधी गिरीश नरोटे
भामरागड, दि. ५ सप्टेंबर २०२६ :
मौजा भामरागड येथील भगवंतराव माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रमशाळेत शनिवार, दि. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिका साकारत शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाला शाळेचे प्राचार्य श्री. एस. एस. पठाण सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. ए. डी. उरकुडे सर तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षक उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात इयत्ता बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी कुमारी सिमरन मंडल हिने प्राचार्याची भूमिका पार पाडली. माध्यमिक गटात कुमारी पूर्वी संतोष भांडेकर हिची उत्कृष्ट शिक्षिका म्हणून निवड करण्यात आली.
माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांमध्ये कुमारी स्वीटी नामदेव बाकडा, कुमारी स्वीटी देवदास बडगे यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवला.
तर उच्च माध्यमिक गटात कुमार आरजू राजकुमार अवस्थी याची उत्कृष्ट शिक्षक म्हणून निवड झाली. कुमारी लक्ष्मी रेनू मज्जी आणि कुमार अंकेश पोदाडी यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी वैष्णवी मडावी आणि कुमारी मनीषा लकडा यांनी केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रमाला उत्साहाचे वातावरण लाभले.
शिक्षकांचे मार्गदर्शन, त्याग आणि विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत असलेले महत्त्व अधोरेखित करत हा शिक्षक दिन सोहळा भगवंतराव माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रमशाळेत आनंदात आणि उत्साहात संपन्न झाला.
