गडचिरोलीत लसीकरणानंतर दोन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू; नातेवाईकांचा निष्काळजीपणाचा आरोप
गडचिरोली, ८ सप्टेंबर: गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात काप्पेवंचा गावात एका दोन महिन्यांच्या बाळाचा लसीकरणानंतर मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पवन शामराव तलांडी असे या मृत बालकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
परिजनांच्या मते, ७ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास आरोग्य सेविका, MPW, आशा वर्कर आणि एका कंत्राटी कर्मचाऱ्याने बाळाला चार इंजेक्शन दिले. यासोबतच त्याला काही औषधेही पाजण्यात आली. लसीकरणानंतर बाळाची प्रकृती बिघडली आणि रात्री १२ च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी आरोग्य विभागावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून, शवविच्छेदनासाठी बाळाला अहेरी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
प्रशासनाकडून अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र सखोल चौकशीची मागणी केली जात आहे.