गडचिरोलीतील धक्कादायक वास्तव! स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही ‘विकास’ रस्त्यातच फसला; कांदोळी नदीसमोर ट्रक फसून वाहतूक ठप्प, शासन-प्रशासनाचा बेफिकीर कारभार उघडा!
बुर्गी (प्रतिनिधी : सुगत उराडे, ८ सप्टेंबर २०२६):
एकीकडे महाराष्ट्राला देशातील ‘सर्वात विकसित आणि प्रगत राज्य’ म्हणून मिरवले जात असताना, दुसरीकडे एका वेडी नक्षलग्रस्त म्हणून ओडखले जात होते आता तर नक्षलवादी सपंले व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्याच्या नशिबी मात्र अद्यापही रस्ते आणि पायाभूत सुविधांसाठीचा मरणयातनादायी संघर्षच पाहायला मिळत आहे. एटापल्ली–बुर्गी–कांदोळी–भामरागड या अत्यंत महत्त्वाच्या मार्गावर, कांदोळी नदीसमोर ७ सप्टेंबर रोजी एक अवजड लोड केलेला ट्रक चिखलात रुतून बसल्याने संपूर्ण वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
जिल्हा निर्मितीला अनेक दशके उलटूनही येथील नागरिकांना ‘विकास’ म्हणजे नेमका काय, हे शोधावे लागत आहे. शासन आणि प्रशासनाच्या बेफिकीर आणि दुर्लक्ष्यी कारभारामुळे ग्रामीण भागातील जनता, विद्यार्थी, मजूर आणि रुग्णांना आपला जीव मुठीत धरून चिखलमय रस्त्यांवरून प्रवास करावा लागत आहे.
निवेदनाला सुशासनाची केराची टोपली?
विशेष म्हणजे, अवघ्या चार दिवसांपूर्वी म्हणजेच ४ सप्टेंबर २०२६ रोजी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पांडा हे एटापल्ली तालुका दौऱ्यावर आले होते. यावेळी ‘तुरगुंडा–बुर्गी–कांदोळी–ताडगाव’ या अत्यंत दुरवस्था झालेल्या मार्गाच्या तातडीने दुरुस्तीसाठी त्यांना स्थानिक प्रतिनिधींकडून रीतसर निवेदन सोपवण्यात आले होते. मात्र, निवेदनाची शाई वाळण्यापूर्वीच रस्त्यात ट्रक फसला आणि प्रशासनाच्या ‘कागदी आश्वासनांची’ पोलखोल झाली.
जिल्हा विकसित, मग हा परिसर भकास का? – राजकीय अनास्था की प्रशासकीय नाकर्तेपणा?
गडचिरोली जिल्हा निर्मिती होऊन अनेक वर्षे उलटली, तरीही अनेक गावे आजही पायाभूत विकासापासून पूर्णपणे वंचित का आहेत?
राजकारणाचा बळी: खनिज संपत्तीने समृद्ध असलेल्या या भागात केवळ राजकारण्यांच्या स्वार्थापोटी आणि निधीच्या पळवापळवीमुळेच हा परिसर मागास ठेवला जात आहे का?
प्रशासनाची संशयास्पद भूमिका: कोट्यवधी रुपयांचा निधी रस्ते विकासासाठी मंजूर होतो, मग तो निधी नेमका जातो कुठे? दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांची हीच अवस्था होत असताना शासन आणि प्रशासन कायमस्वरूपी उपाययोजना का करत नाही?
नागरिकांचा संतप्त आक्रोश; कायमस्वरूपी तोडगा काढण्याची जोरदार मागणी
या धक्कादायक घटनेमुळे बुर्गी आणि परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. बुर्गी ग्रामपंचायतीचे सरपंच विलास गावडे, सामाजिक कार्यकर्ते सुगत उराडे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. प्रशासनाने आता केवळ पाहणीचे नाटक न करता, या मार्गाचे डांबरीकरण आणि कांदोळी नदीवरील पुलाचे काम तातडीने हाती घेऊन या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल!
