भामरागड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याचा ठराव मंजूर!
शेततळे व जलसंधारणाची कामे तातडीने सुरू करा – आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम
वार्षिक आमसभेत विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा; शेतकरी, शिक्षण, आरोग्य, वीज व पाणीप्रश्नांवर प्रशासनाला निर्देश
गडचिरोली | भामरागड | तालुका प्रतिनिधी : गिरीष डी. नरोटे
भामरागड : दुर्गम व अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांना यंदा दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याने भामरागड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याचा ठराव वार्षिक आमसभेत मंजूर करण्यात आला. शेतकऱ्यांचे तातडीने सर्वेक्षण करून शेततळे व जलसंधारणाची कामे प्राधान्याने मंजूर करून प्रत्यक्षात सुरू करावीत, असे निर्देश आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी प्रशासनाला दिले.
बुधवारी (ता. २५) पंचायत समिती भामरागड येथे आयोजित वार्षिक आमसभेत ते बोलत होते. यावेळी तालुक्यातील विविध शासकीय विभागांच्या कामकाजाचा, विकास योजनांचा आणि प्रलंबित प्रश्नांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
सभेच्या प्रारंभी संवर्ग विकास अधिकारी अतुल इंगळे यांनी आमदार आत्राम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. भगवान बिरसा मुंडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने सभेची सुरुवात झाली.
शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी बियाण्यांचे वाटप करण्यात आले. तसेच प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण आणि उपक्रमशील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. तालुक्यात ४३ शिक्षक उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार आत्राम यांचे कौतुक करण्यात आले. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना त्यांनी केल्या.
वनहक्क पट्ट्यांचे वितरण, शबरी घरकुल योजनेसह इतर घरकुल योजनांना गती देणे आणि अपूर्ण घरकुले तातडीने पूर्ण करण्याबाबत चर्चा झाली. घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती शून्य रॉयल्टीने उपलब्ध करून देण्यासाठीचे पोर्टल दोन दिवसांत सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली.
ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत ठेवणे, वाढीव वीजबिलांचा प्रश्न सोडविणे, महावितरणच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे, भामरागड ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करणे, रखडलेल्या पाणीपुरवठा योजना सुरू करणे आणि अंगणवाड्यांमधील रिक्त पदे भरण्याबाबतही आमदारांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
विकासकामे केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्षात पूर्ण झाली पाहिजेत. नागरिकांच्या मूलभूत समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने व जबाबदारीने काम करावे, असे आवाहन आमदार आत्राम यांनी केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हर्षवर्धनराव बाबा आत्राम उपस्थित होते. तसेच इंदरशहा मडावी, लालसू आत्राम, रमेश मारगोनवार, लक्ष्मण येरावार, सलीम शेख, रामजी भांडेकर, गफ्फार शेख, शब्बरबेग मोगल, तहसीलदार किशोर बागडे, संवर्ग विकास अधिकारी अतुल इंगळे, मुख्याधिकारी अभिजित सोनवने, रोषना चव्हाण, डॉ. मनिष धकाते, वैद्यकीय अधीक्षक कन्नाके, गटशिक्षणाधिकारी गणेश पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनीत पद्मावर यांनी केले. प्रास्ताविक देवानंद गायकवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन गणेश पाटील यांनी केले.
नवदांपत्य अमन जक्कोजवार व अंजली यांना राजे अम्ब्रीशराव महाराजांच्या शुभेच्छा!
अहेरी येथे जक्कोजवार कुटुंबीयांची घेतली सदिच्छा भेट; नव्या वैवाहिक जीवनासाठी केले अभिनंदन
गडचिरोली | अहेरी | तालुका प्रतिनिधी : गिरीष डी. नरोटे
अहेरी : अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी अहेरी येथील नवविवाहित अमन जक्कोजवार व अंजली जक्कोजवार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी नवदांपत्याचे अभिनंदन करून त्यांच्या नवीन वैवाहिक जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
विवाहानंतर नव्या आयुष्याची सुरुवात करणाऱ्या अमन व अंजली यांच्याशी राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी आस्थेने संवाद साधला. तसेच जक्कोजवार परिवारातील सदस्यांची आपुलकीने विचारपूस करून त्यांच्या आनंदाच्या क्षणात सहभागी झाले.
या सदिच्छा भेटीप्रसंगी नवदांपत्याला सुखी, समृद्ध आणि आनंदी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या भेटीमुळे जक्कोजवार परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी युवा नेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम तसेच जक्कोजवार कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
