मुलचेराच्या प्रश्नांवर ‘गणगर्जन’; शासनाला १५ दिवसांचा अल्टिमेटम!
दोन दिवसांत एसटी बसफेऱ्या सुरू करा; अन्यथा विद्यार्थ्यांसह अहेरी आगारावर आंदोलनाचा इशारा
मुलचेरा : तालुक्यातील रस्ते, वीज, खत, धान बोनस आणि एसटी बसफेऱ्यांसह विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आणि विद्यमान सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर) यांच्या नेतृत्वाखाली मुलचेरा येथील नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात ‘गणगर्जन ठिय्या आंदोलन’ करण्यात आले.
विभागीय अध्यक्षा शाहीनताई हकीम यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनाला युवा नेते ऋतुराज साहेब हलगेकर यांची उपस्थिती होती. यावेळी अजित राय, सालय्या कंबलवार, समीर अधिकारी, ऋषीदादा पोरतेट आदींनी तालुक्यातील विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधत त्या तातडीने सोडविण्याची मागणी केली.
रस्त्यांच्या प्रश्नासाठी १५ दिवसांची मुदत
मुलचेरा तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था हा नागरिकांसाठी गंभीर प्रश्न बनला असून, यामुळे दळणवळणासह विद्यार्थ्यांना व शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा आंदोलनादरम्यान उपस्थित करण्यात आला. भाग्यश्रीताई आत्राम यांनी रस्त्यांच्या समस्या येत्या १५ दिवसांत मार्गी लावाव्यात, अशी मागणी करत प्रशासनाला अल्टिमेटम दिला.
विद्यार्थ्यांचा एसटी प्रश्न ऐरणीवर
तालुक्यातील शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या एसटी बसफेऱ्या सुरू करण्याची मागणीही यावेळी जोरदारपणे करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आंदोलनस्थळी उपस्थित अधिकाऱ्यांसमोर वाहतुकीच्या अडचणी मांडल्या.
शाहीनताई हकीम यांनी दोन दिवसांत एसटी बसफेऱ्या सुरू न झाल्यास विद्यार्थ्यांना सोबत घेऊन अहेरी एसटी आगारावर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.
आंदोलनस्थळी चार्मोशीचे उपविभागीय अधिकारी तसेच मुलचेरा तालुक्यातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. त्यामुळे नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांवर प्रशासनाकडून काय कार्यवाही केली जाते, याकडे आता तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
आंदोलनाला विष्णू राय, मनोज कर्मकार, माजी सरपंच जया मंडल, डॉ. निखिल इज्जतदार, माजी जि.प. सदस्य ज्ञानकुमारी कौशी, जहीर हकीम, श्रीनिवास विरगोनवार, रहेमान शेख, स्वप्नील श्रीरामवार, शैलेश गेडाम, सुमित मोतकुरवार, संतोष येमुलवार, विनोद चव्हाण, अप्सरभाई यांच्यासह शेकडो नागरिक, शेतकरी व व्यापारी उपस्थित होते.
आता १५ दिवसांचा अल्टिमेटम आणि एसटीसाठी दोन दिवसांची मुदत यामुळे मुलचेरा तालुक्यातील या प्रश्नांवर प्रशासन कोणती ठोस पावले उचलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे
