वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; निमलगुडम येथे शाळा व साथी शेतकरी महिला गटाचा संयुक्त उपक्रम
अहेरी (प्रतिनिधी): रमेश बामणकर
तालुक्यातील गुड्डीगुडम जवळील निमलगुडम येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व साथी शेतकरी महिला गट यांच्या संयुक्त विद्यमाने गावात मोठ्या उत्साहात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.
शिक्षकांप्रती आदर व्यक्त करणारा ‘शिक्षक दिन’, श्रीकृष्णाच्या जन्माचा ‘कृष्ण जन्माष्टमी’ उत्सव आणि बळीराजाचा लाडका ‘पोळा’ सण या तिन्ही औचित्य साधून या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘झाडे लावा, झाडे जगवा’ आणि ‘पर्यावरण स्वच्छ ठेवा’ असा मोलाचा संदेश गावकऱ्यांना देण्यात आला.
दिवसेंदिवस वाढत्या प्रदूषणामुळे बिघडत चाललेला पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी गावात जास्तीत जास्त झाडे लावणे आणि लावलेल्या झाडांचे केवळ संगोपनच नव्हे, तर संवर्धन करण्याचा दृढ संकल्प या प्रसंगी उपस्थितांनी केला.
या हिरव्यागार उपक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमलगुडमचे विद्यार्थी, शिक्षक वृंद तसेच साथी शेतकरी महिला गटाच्या सदस्या व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे या कार्यक्रमाला विशेष शोभा आली.
