*भेंडाळा येथील प्रस्तावित एमआयडीसी रद्द करा; चामोर्शीत शेतकऱ्यांचा बैलबंड्यांसह धडक मोर्चा*
प्रतिनिधि:- जी . उमेश
चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमिनींवर प्रस्तावित असलेली एमआयडीसी रद्द करावी आणि भूसंपादन तातडीने थांबवावे, या मागणीसाठी ‘शेतकरी बचाव जनआंदोलन समिती’च्या नेतृत्वाखाली गुरुवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. भरउन्हात काढण्यात आलेल्या या आंदोलनात भेंडाळा परिसरातील १३ हून अधिक गावांतील शेकडो शेतकरी आपल्या बैलबंड्यांसह, महिला व शेतमजुरांसह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चाला महाविकास आघाडी व मित्रपक्षांनी जाहीर पाठिंबा दिला.
प्रस्तावित एमआयडीसीमुळे हजारो एकर सुपीक आणि बारमाही सिंचनाची शेती नष्ट होऊन शेतकरी व शेतमजूर देशोधडीला लागतील, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ अंतर्गत जारी केलेल्या भूसंपादनाच्या सर्व नोटीस तातडीने मागे घ्याव्यात.
उद्योगांसाठी सुपीक जमिनीऐवजी पडीत किंवा शासकीय जमिनीचा वापर करावा आणि जमीन घेण्यापूर्वी स्थानिक शेतकऱ्यांची कायदेशीर संमती बंधनकारक करावी. शासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून भूसंपादन प्रक्रिया न थांबवल्यास, आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र आणि व्यापक केले जाईल, असा इशारा ‘शेतकरी बचाव जनआंदोलन समिती’ने प्रशासनाला दिला आहे.
