शांतिग्राम-कोठारी जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्राचा राजे अम्ब्रीशराव महाराजांनी घेतला आढावा!
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याचे आवाहन; अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार
मुलचेरा | लगाम | तालुका प्रतिनिधी : गिरीश डी. नरोटे
मुलचेरा तालुक्यातील शांतिग्राम-कोठारी जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रातील राजकीय आणि संघटनात्मक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी लगाम येथे महत्त्वपूर्ण आढावा सभा आयोजित करण्यात आली होती. अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा पार पडली.
यावेळी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी प्रत्येक कार्यकर्त्याने आतापासूनच जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले. गावागावांत जाऊन नागरिकांशी संपर्क वाढवावा, पक्षाचे संघटन अधिक मजबूत करावे, तसेच जनतेच्या अडचणी आणि समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
सभेदरम्यान आगामी निवडणुकांची रणनीती, बूथस्तरावरील संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांची जबाबदारी आणि परिसरातील सद्य राजकीय परिस्थिती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी निवडणुकांमध्ये संघटितपणे काम करून जनतेचा विश्वास संपादन करण्यावरही भर देण्यात आला.
पाचही तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी पाठपुरावा करणार!
दरम्यान, अहेरी विधानसभा क्षेत्रातील मुलचेरा, एटापल्ली, अहेरी, सिरोंचा आणि भामरागड या पाचही तालुक्यांमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून या सर्व तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे आश्वासन राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी यावेळी दिले.
या आढावा सभेला युवा नेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, तालुकाध्यक्ष संजीव सरकार, सामाजिक कार्यकर्ते संतोष उरेते, मारोती पेंदाम, विविध बूथ प्रमुख, परिसरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लगाम येथे झालेल्या या आढावा सभेमुळे शांतिग्राम-कोठारी क्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग आल्याचे चित्र दिसून आले.
