“मुली म्हणजे देशाचे उज्ज्वल भविष्य” — कस्तुरबा विद्यालयाच्या ८ विद्यार्थिनींचे शिष्यवृत्ती परीक्षेत दैदिप्यमान यश!
सिरोंचा :
सिरोंचा येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाने पुन्हा एकदा आपल्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटवत इयत्ता ८ वीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयातील तब्बल ८ विद्यार्थिनी शिष्यवृत्तीस पात्र ठरल्या असून संपूर्ण तालुक्यात त्यांचे कौतुक होत आहे.
ग्रामीण व दुर्गम भागातील मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत असलेल्या या विद्यालयातील विद्यार्थिनींनी कठोर परिश्रम, जिद्द आणि शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाच्या बळावर हे यश मिळवले आहे. “मुली शिकल्या तर देश घडतो” हा संदेश या यशातून पुन्हा अधोरेखित झाला आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या गुणवंत विद्यार्थिनींमध्ये कु. जमुना समय्या दुर्गम हिने ७० टक्के गुण मिळवत विशेष यश संपादन केले असून कु. हर्षिता सडवली कारसपल्ली हिने ६८.६६ टक्के गुण प्राप्त केले. इतर विद्यार्थिनींनीही उत्कृष्ट गुण मिळवत विद्यालयाचा नावलौकिक वाढविला आहे.
यशस्वी विद्यार्थिनींची नावे पुढीलप्रमाणे आहेत —
कु. अक्षता प्रभाकर दुर्गे, कु. अमिता सीनू सीरंगी, कु. अनुग्रा बापू कोंडगोर्ला, कु. अनुशा व्यंकटी सावतकारी, कु. जमुना समय्या दुर्गम, कु. हिंदू मोहन कुम्मरी, कु. हर्षिता सडवली कारसपल्ली आणि कु. अनुवर्षिनी रमेश पोट्टाला.
या घवघवीत यशाबद्दल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु. मनीषा साखरे, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व शाळा व्यवस्थापन समितीने विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. तसेच सिरोंचा परिसरातील नागरिकांनीही या गुणवंत लेकींवर शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
“आजच्या मुली उद्याच्या भारताचा मजबूत पाया आहेत. शिक्षणाच्या बळावर त्या प्रत्येक क्षेत्रात यश संपादन करू शकतात,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
