नियोजित चिकन-मटण मार्केट असताना रस्त्यांवरच दुकाने!
अतिक्रमण, अस्वच्छता आणि मांस कचऱ्यामुळे नागरिक त्रस्त; नगर पंचायत प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष
सिरोंचा | प्रतिनिधी
सिरोंचा नगर पंचायतने चिकन व मटण विक्रीसाठी नियोजित मार्केटची व्यवस्था उपलब्ध करून दिलेली असतानाही शहरातील विविध प्रभागांमध्ये तसेच मुख्य रस्त्यांच्या कडेला अनधिकृत पद्धतीने चिकन-मटण विक्रीची दुकाने सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे सार्वजनिक जागेवरील अतिक्रमणासोबतच स्वच्छता आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरातील रस्त्यांच्या बाजूला सुरू असलेल्या काही चिकन-मटण दुकानांमधून निघणारे मांसाचे अवशेष, कचरा व टाकाऊ पदार्थ उघड्यावर किंवा रस्त्याच्या कडेला टाकले जात असल्याने परिसरात दुर्गंधी व अस्वच्छता निर्माण होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. या कचऱ्यामुळे भटक्या कुत्र्यांचा वावर वाढत असून पादचारी, वाहनचालक तसेच शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीर होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
रस्त्यांवर दुकाने; वाहतुकीलाही अडथळा
रस्त्याच्या कडेला दुकाने थाटल्यामुळे सार्वजनिक जागेचा वापर व्यापारी कामासाठी होत असून काही ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचा आरोप आहे. यामुळे नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे.
नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रमुख समस्यांमध्ये रस्त्यालगतची चिकन-मटण दुकाने, सार्वजनिक जागेवरील अतिक्रमण, वाहतुकीतील अडथळे, मांस कचऱ्यामुळे होणारी अस्वच्छता, दुर्गंधी आणि भटक्या कुत्र्यांचा वाढता वावर यांचा समावेश आहे.
नियोजित मार्केट असताना रस्त्यावरील दुकाने का?
चिकन-मटण विक्रीसाठी नियोजित मार्केट उपलब्ध असताना रस्त्यांच्या कडेला दुकाने सुरू राहण्यास परवानगी कशी दिली जात आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नगर पंचायत प्रशासनाने या संपूर्ण प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन प्रत्येक प्रभागातील अशा दुकानांची संयुक्त पाहणी करावी, अशी मागणी होत आहे.
सामाजिक कार्यकर्ते जयंत मंडवे यांची कारवाईची मागणी
सामाजिक कार्यकर्ते जयंत मंडवे यांनी सिरोंचा नगर पंचायत प्रशासनाकडे या प्रश्नावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांनी शहरातील रस्त्यांच्या बाजूला असलेल्या चिकन-मटण दुकानांची तपासणी करून अनधिकृत अतिक्रमणे नियमानुसार हटवावीत. तसेच स्वच्छता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करून मांसाचा कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकला जाणार नाही, यासाठी प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
“रस्ता नागरिकांसाठी आहे—अतिक्रमणासाठी नाही. नियोजित मार्केट असताना रस्त्यांवर दुकाने का?” असा सवाल उपस्थित करत नगर पंचायत प्रशासनाने आता ठोस कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.
नियोजित मार्केट असतानाही रस्त्यांच्या कडेला दुकाने सुरू असल्याचा नागरिकांचा आरोप; तातडीने पाहणी व कारवाईची मागणी श्री जयंत मांडवे
