सुरजागड इलाक्यातील ७० गावांत DJ संस्कृतीला ‘नो एंट्री’!
पारंपरिक वाद्ये, गोंडी-माडिया संस्कृती व रूढी-परंपरा जपण्यासाठी महाग्रामसभेचा ठराव; DJ लावल्यास १ लाख रुपयांच्या दंडाचा निर्णय
प्रतिनिधी : सुगत उराडे
एटापल्ली | दि. ३० सप्टेंबर २०२६ : सुरजागड पारंपरिक महाग्रामसभा इलाका सुरजागडच्या मासिक सभेत इलाका सुरजागड अंतर्गत येणाऱ्या ७० गावांमध्ये लग्न, साखरपुडा, वाढदिवस तसेच अन्य सामाजिक कार्यक्रमांमध्ये DJ वाजविण्यावर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
सभेत शेहना, मुखिया, गायता, पुजारी तसेच महिला मंडळांच्या प्रतिनिधींनी चर्चा केली. बाहेरून आलेल्या DJ संस्कृतीमुळे पारंपरिक कोया पुनेम संस्कृती, गोंडी-माडिया भाषा, पारंपरिक वाद्ये आणि रूढी-परंपरांवर परिणाम होत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. त्यानंतर ठराव क्र. ०४/२०२६ मंजूर करण्यात आला.
DJ लावल्यास १ लाख रुपयांचा दंड
महाग्रामसभेच्या ठरावानुसार, इलाका सुरजागडच्या ७० गावांच्या हद्दीत लग्न, साखरपुडा, वाढदिवस किंवा अन्य सामाजिक कार्यक्रमांमध्ये DJ लावण्यास मनाई करण्यात आली आहे. या निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्यावर ग्रामसभेच्या निर्णयानुसार १ लाख रुपयांचा दंड तसेच सामाजिक कारवाई करण्याचे नमूद करण्यात आले आहे.
पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन
DJ ऐवजी मांदल, ढोल, किकडी, मोहरी आणि डपरा यांसारख्या पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर गोंडी गाणी, रेला, फाग आणि दंडारी नृत्य यांसारख्या पारंपरिक कला व सांस्कृतिक परंपरांचे जतन करण्यावर भर देण्यात आला.
DJ बंदीमागे १२ प्रमुख कारणे
महाग्रामसभेने DJ बंदीमागे संस्कृतीचे संरक्षण, रूढी-परंपरांचे जतन, गोंडी-माडिया भाषेचे संवर्धन, अनावश्यक आर्थिक खर्चाला आळा, ध्वनिप्रदूषण, आरोग्यावर होणारा परिणाम, भांडण-तंटे, विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणारा परिणाम, कायदा-सुव्यवस्था, महिला सुरक्षा आणि पारंपरिक कलांना रोजगाराच्या संधी यांसारखी कारणे नमूद केली आहेत.
सभेच्या मते, DJ वर होणारा खर्च गावाबाहेरील व्यावसायिकांकडे जाण्याऐवजी स्थानिक पारंपरिक वाद्य पथकांना मिळाल्यास गावातील युवकांना रोजगाराची संधी निर्माण होऊ शकते.
७० गावांत दवंडी देऊन निर्णयाची माहिती
महाग्रामसभेच्या या निर्णयाची माहिती इलाका सुरजागड अंतर्गत येणाऱ्या सर्व ७० गावांमध्ये दवंडीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक ग्रामसभेने आपल्या गावातही अशाच स्वरूपाचा ठराव मंजूर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
“आमची संस्कृती, आमची परंपरा आणि आमची ओळख जपण्यासाठी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे,” असा सूर सभेत व्यक्त करण्यात आला.
महाग्रामसभेने हा निर्णय पेसा कायदा १९९६ आणि महाराष्ट्र पेसा नियमांतील ग्रामसभेच्या रूढी, परंपरा व सांस्कृतिक जतनाच्या अधिकारांचा आधार घेत घेतल्याचे ठरावात नमूद केले आहे.
पारंपरिक महाग्रामसभा, इलाका सुरजागड
जय आदिवासी! जय जोहार!
