वनहक्क दाव्यांच्या निकाली काढण्यासाठी मुदतवाढ द्या
जिल्हा महाग्रामसभेचे महसूल मंत्र्यांना निवेदन; ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढीची मागणी
गडचिरोली, दि. १ ऑक्टोबर २०२६ | प्रतिनिधी : गिरीष डी. नरोटे : वनहक्क अधिनियम २००६ अंतर्गत प्रलंबित असलेले दावे तातडीने निकाली काढण्यासाठी देण्यात आलेली मुदत ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढविण्यात यावी, अशी मागणी जिल्हा महाग्रामसभा गडचिरोलीच्या वतीने करण्यात आली.
याबाबत जिल्हा महाग्रामसभा गडचिरोलीच्या वतीने मा. जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन साद करण्यात आले.
वनहक्क अधिनियम २००६ अंतर्गत अनेक दावे अद्याप प्रलंबित असून, संबंधित दाव्यांची प्रक्रिया पूर्ण करून पात्र दावेदारांना न्याय मिळण्यासाठी अधिक वेळ आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रलंबित वनहक्क दावे तातडीने निकाली काढण्यासाठी सदर मुदत ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढवावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी जिल्हा महाग्रामसभा अध्यक्ष श्री. नितीन पदा यांच्यासह जिल्हा महाग्रामसभेचे पदाधिकारी उपस्थित होते.
वनहक्क कायद्यांतर्गत प्रलंबित दाव्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हा महाग्रामसभेच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू असून, जल, जंगल, जमीन आणि वनहक्कांच्या संरक्षणासाठी जिल्हा महाग्रामसभेचा लढा सुरूच राहणार, अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.
