अहेरी पोलिसांची धडक कारवाई: २१.५३ लाखांचा सुगंधी तंबाखू आणि अवैध बीटी बियाणे न्यायालयाच्या आदेशाने ‘भस्मसात‘
अहेरी (गडचिरोली):-
गुन्हेगारी आणि बेकायदेशीर कृत्यांवर कायद्याचा बडगा उगारत अहेरी पोलिसांनी आज एक मोठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडली. सन २०२५ मधील विविध आठ गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला, मानवी आरोग्यास घातक ठरणारा सुगंधी तंबाखू आणि अवैध बीटी बियाणांचा भलामोठा साठा अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार नष्ट करण्यात आला. नष्ट करण्यात आलेल्या या एकूण मुद्देमालाची किंमत २१ लाख ५३ हजार १४२ रुपये आहे.
पोलीस अधीक्षक मा. एम. रमेश, अप्पर पोलीस अधीक्षक मा. कार्तिक मधिरा, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली, अहेरी पोलीस स्टेशनचे धडाडीचे पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या थेट देखरेखीखाली ही मोठी मोहीम राबवण्यात आली.
कायद्याच्या चौकटीत राहून, माननीय न्यायालयाच्या स्पष्ट निर्देशानुसार आज दोन पंचांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत ही नष्टीकरण मोहीम अत्यंत पारदर्शकतेने राबवण्यात आली. नष्ट करण्यात आलेल्या मुद्देमालाचा तपशीलात
मानवी आरोग्यास घातक सुगंधी तंबाखू ११,९०,१८०/- , शेतकऱ्यांची फसवणूक करणारा अवैध बीटी बियाणांचा साठा ९,६२,९६२/-
एकूण नष्ट करण्यात आलेला एकूण मुद्देमाल २१,५३,१४२/-.
समाजाला व्यसनाच्या खाईत लोटणारा सुगंधी तंबाखू आणि अन्नदात्या शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करणारे बेकायदेशीर बीटी बियाणे कायदेशीररीत्या पूर्णपणे नष्ट करून त्याचे अस्तित्व संपविण्यात आले आहे.
•अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले!
पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या या धडक, आक्रमक आणि पारदर्शक कृतीमुळे अहेरी परिसरातील अवैध धंदेवाल्यांचे आणि तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. अहेरी पोलिसांच्या या चोख कायदेशीर कारवाईचे आणि तत्परतेचे सर्वसामान्य नागरिकांमधून आणि शेतकरी वर्गातून सर्वत्र कौतुक होत आहे.
