चौकशी अहवालासाठी ग्रामसभा पदाधिकाऱ्यांचे निवेदन
ग्रामसेवक निलंबित; चौकशी अहवाल देण्यास टाळाटाळ केल्याचा ग्रामसभा पदाधिकाऱ्यांचा आरोप
विशेष प्रतिनिधी | एटापल्ली
एटापल्ली तालुक्यातील सेवारी ग्रामपंचायतीच्या कथित भोंगळ कारभाराबाबत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनंतर ग्रामसेवक मनोज गेडाम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र, या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यानंतरही चौकशी अहवालाची प्रत मागणी करून मिळत नसल्याचा आरोप ग्रामसभा पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे.
या संदर्भात ग्रामसभा पदाधिकारी व सदस्यांनी गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले. निवेदनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, सीईओ यांनी भ्रमणध्वनीद्वारे एटापल्लीचे गटविकास अधिकारी श्रीकृष्ण पेंदाम यांना संबंधितांना चौकशी अहवाल उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या.
मात्र, त्यानंतरही चौकशी अहवालाची प्रत देण्यात आली नसल्याचा आरोप निवेदनकर्त्यांनी केला आहे. “आता मला अहवाल देता येणार नाही; तुम्ही माहितीच्या अधिकारात मागणी करा,” असे गटविकास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आल्याचा दावा ग्रामसभा पदाधिकारी व सदस्यांनी निवेदनात केला आहे.
पारदर्शकतेची मागणी
चौकशी अहवाल तयार झालेला असल्यास त्याची प्रत संबंधित ग्रामसभा पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्यांना उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, तक्रारीवरील चौकशी, त्यातील निष्कर्ष आणि त्यानुसार करण्यात आलेल्या कारवाईबाबत प्रशासनाने पारदर्शकता ठेवून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन देणारे
राजू गोमाडी – ग्रामसभा अध्यक्ष
नांगसाय गावडे – ग्रामसभा सचिव
गणेश तलांडे – सदस्य
अमित गोमाडी, शुभम पुंगाटी, रंजित गावडे, सुरज नरोटे, नितेश मटामी
तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी सुलभा गोमाडी, पल्लवी गावतुरे, पुष्पा चाटारे व रिना गावडे या सदस्यांसह सेवारी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
