सुरजागड येथे पारंपरिक महाग्रामसभा; खाण प्रकल्पासह आदिवासी, वनहक्क व सामाजिक प्रश्नांवर मंथन
एटापल्ली | तालुका प्रतिनिधी : गिरीष डी. नरोटे
एटापल्ली तालुक्यातील मौजा सुरजागड येथे पारंपरिक इलाका महाग्रामसभा समिती, सुरजागड यांच्या वतीने बुधवार, दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी पारंपरिक महाग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी इलाका चेहना श्री. कन्नाजी गोटा होते.
या महाग्रामसभेत सुरजागड इलाका क्षेत्रातील प्रस्तावित खाण प्रकल्पाबाबत ठोस भूमिका घेण्याच्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच आदिवासी समाजातील धार्मिक परिवर्तनाच्या प्रश्नावर प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली.
इलाका क्षेत्रातील सुशिक्षित युवक-युवतींना कार्यशाळांच्या माध्यमातून एकत्रित करून सामाजिक प्रश्नांवर संघटितपणे काम करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या जमिनींशी संबंधित अतिक्रमणाचे प्रश्न तसेच नवीन वनहक्क दावे सादर करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
महाग्रामसभेत परिसरातील देशी व विदेशी दारूच्या विक्रीवर प्रतिबंध घालण्याबाबतही चर्चा झाली. तसेच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झालेल्या नवीन बांबू कटाईबाबत संबंधित ग्रामसभेसाठी जाहीर लिलाव प्रक्रिया राबविण्याच्या विषयावर विचारविनिमय करण्यात आला.
याशिवाय आदिवासी समाजातील युवक-युवती विविध राजकीय पक्षांमध्ये विभागले गेले असले तरी सामाजिक प्रश्न आणि समाजहिताच्या विषयांवर मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने काम करण्याचे आवाहन सभेत करण्यात आले.
या महाग्रामसभेला इलाका समितीचे पदाधिकारी, विविध ग्रामसभांचे पदाधिकारी, गाव पाटील, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच सुरजागड इलाका क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेत विविध सामाजिक, वनहक्क, शेती, रोजगार व स्थानिक विकासाशी संबंधित प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली.
