कालेश्वर येथे त्रिवेणी संगमावर भक्तीचा महासागर; सरस्वती अंत्य पुष्कर सोहळ्याला भव्य प्रारंभ
गोदावरी, प्राणहिता आणि अदृश्य सरस्वतीच्या पवित्र त्रिवेणी संगमावर वसलेल्या येथे सरस्वती अंत्य पुष्कर सोहळ्याला आज पहाटे अत्यंत भक्तिमय वातावरणात भव्य सुरुवात झाली. कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरू यांच्या हस्ते पवित्र पुष्कर स्नान पार पडले आणि वैदिक मंत्रोच्चारात सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. “हर हर महादेव”च्या जयघोषाने संपूर्ण संगम क्षेत्र दुमदुमून गेले.
या वेळी तेलंगणा सरकारच्या वतीने आयोजित सोहळ्यास , यांच्यासह विविध धार्मिक गुरू, संत-महंत आणि हजारो भाविक उपस्थित होते. महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड आणि आंध्रप्रदेशातून मोठ्या संख्येने भाविक कालेश्वर येथे दाखल झाले आहेत.
सरकारने या १२ दिवसीय सोहळ्यासाठी तब्बल ३०.६३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून ३० ते ४० लाख भाविक येण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. भाविकांच्या सोयीसाठी ९० विशेष शटल बस, ५०० स्वच्छतागृहे, मोठ्या प्रमाणावर पार्किंग, पिण्याचे पाणी, सावली मंडप आणि ओआरएस पॅकेट्सची व्यवस्था करण्यात आली आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने घाट परिसरात २०० सीसीटीव्ही कॅमेरे, एसडीआरएफ पथके, सुरक्षा बोटी आणि विशेष बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच आरोग्य विभागाकडून २३ झोनमध्ये वैद्यकीय शिबिरे उभारण्यात आली असून ३०० डॉक्टर व पॅरामेडिकल कर्मचारी सेवेत नियुक्त करण्यात आले आहेत.
दरम्यान, दररोज विशेष पूजा, होम-हवन, भव्य गोदावरी आरती, सांस्कृतिक कार्यक्रम आणि तेप्पोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून कालेश्वर नगरी सध्या भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माने उजळून निघाली आहे.
