“जेथे व्यवस्था थांबली, तेथे खाकी उभी राहिली”; रायगुडम ग्रामस्थांसाठी पातागुडम पोलिसांचा सामाजिक उपक्रम
गडचिरोली, दि. २२ मे :
पोलीस स्टेशन पातागुडम यांनी सामाजिक बांधिलकी जपत मौजा रायगुडम येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याच्या विहिरीसाठी नवीन मोटार स्वखर्चाने भेट दिली. गावातील जुन्या मोटारीमध्ये बिघाड झाल्याने नागरिकांना पाण्याच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत होते.
ही अडचण लक्षात घेऊन पातागुडम पोलिसांनी पुढाकार घेत स्वतःच्या खर्चातून नवीन मोटार उपलब्ध करून दिली. त्यामुळे गावातील पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत झाला असून ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. या मदतीबद्दल ग्रामस्थांनी पोलीस विभागाचे आभार मानत समाधान व्यक्त केले.
या उपक्रमामुळे पोलीस आणि नागरिकांमधील विश्वास व आपुलकी अधिक दृढ झाली असून “जनतेसाठी पोलीस” ही भावना पुन्हा अधोरेखित झाली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पोलीस विभाग सदैव तत्पर असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या उपक्रमात प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर धोत्रे, पीएसआय मंगेश कोठावळे, पीएसआय स्वाती बाष्टेवाड तसेच पोलिस अंमलदार मनोज नैताम, सुधीर पोकला, शुभम वैद्य व इतर कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
