सिरोंचा ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी
सिरोंचा : गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अतिदुर्गम सिरोंचा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय (SDH) दर्जा देण्यात यावा, अशी मागणी शिवसेना (शिंदे गट) ओबीसी विभागाचे शहर प्रमुख रविकांत सत्यनारायण बुरावार यांनी आरोग्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सिरोंचा तालुक्यातील १०५ हून अधिक गावांतील नागरिक उपचारासाठी या रुग्णालयावर अवलंबून आहेत. मात्र तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता, अपुऱ्या सुविधा व केवळ ३० खाटांची व्यवस्था असल्याने गंभीर रुग्णांना तेलंगणा राज्यात उपचारासाठी जावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
गडचिरोली मुख्यालय २२० किलोमीटर अंतरावर असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे सिरोंचा ग्रामीण रुग्णालयाला तातडीने उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊन आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
संपादक सुरेश तिपट्टीवार सिरोचा
