मान्सूनपूर्व तयारीसाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
गडचिरोली, दि. 20 : संभाव्य पूरस्थिती आणि आपत्तीजनक परिस्थिती लक्षात घेता सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करून ठोस कृती आराखडा तयार करावा, असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी मान्सूनपूर्व आढावा बैठकीत दिले.
पूरप्रवण भागांमध्ये विशेष सतर्कता ठेवणे, दुर्गम गावांमध्ये अन्नधान्य, औषधे व इंधनसाठा उपलब्ध ठेवणे, तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास कार्यान्वित ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. भामरागड, एटापल्ली आणि सिरोंचा तालुक्यांमध्ये जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबविण्यावर भर देण्यात आला.
आरोग्य विभागाने सर्पदंश, मलेरिया, मेंदूज्वर व गॅस्ट्रोवरील औषधसाठा उपलब्ध ठेवावा, तर ग्रामपंचायतींनी पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची स्वच्छता राखावी, असेही त्यांनी सांगितले. पूरकाळात पुलावरून पाणी वाहत असताना वाहन चालवू नये तसेच परवानगीशिवाय नदीपात्रात बोट किंवा होडी घेऊन जाण्यास मनाई राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
