पद्मा भोगे यांची दमदार सुरुवात; पाणीप्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर
सिरोंचा : सिरोंचा नगरपंचायतीच्या नवनियुक्त नगराध्यक्षा पद्माताई सतीश भोगे यांनी पदभार स्वीकारताच नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली असून, प्रभाग क्रमांक ४ मधील पाणीटंचाईच्या प्रश्नावर तातडीने कारवाई करत प्रशासनाला ॲक्शन मोडवर आणले आहे.
प्रभागातील नागरिकांकडून सतत पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होताच नगराध्यक्षा पद्माताई भोगे यांनी नगरपंचायत अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना देत समस्या लवकरात लवकर निकाली काढण्याचे आदेश दिले. त्यांच्या निर्देशानंतर नगरपंचायत प्रशासनाने त्वरित हालचाली सुरू करत आज सकाळपासूनच जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम सुरू केले.
यावेळी जुनी जलवाहिनी दुरुस्त करण्याबरोबरच आवश्यक त्या ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. पुढील २४ तासांत प्रभागातील पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा विश्वास नगरपंचायत अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
कामाची पाहणी करताना नगरसेवक सतीश भोगे, नगरसेवक नरेश अलोने, रोहित पिल्लीवार यांच्यासह प्रभागातील अनेक नागरिक उपस्थित होते. नागरिकांनी तातडीने दखल घेऊन काम सुरू केल्याबद्दल नगराध्यक्षा पद्माताई भोगे यांचे आभार मानले.
