सिरोंच्यातील वीज संकटावर नगराध्यक्षांचा आक्रमक पवित्रा; महावितरणला तात्काळ उपाययोजनांचे निर्देश
सिरोंचा शहरात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, कमी-जास्त दाबाची समस्या आणि सततच्या लोडशेडिंगमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या गंभीर समस्येची दखल घेत नगराध्यक्ष सौ. पद्मा सत्यनारायण भोगे यांनी नगरसेवकांच्या शिष्टमंडळासह महावितरण कार्यालयात भेट देत अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि तात्काळ कायमस्वरूपी तोडगा काढण्याची ठाम मागणी केली.
महावितरणचे अभियंता दिनेश सिडाम यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शहरातील विविध प्रभागांमध्ये वारंवार होणारा वीजपुरवठा खंडित होणे, लाईटची सतत ये-जा, कमी दाबाचा वीजपुरवठा तसेच रखडलेली दुरुस्ती व देखभाल कामे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत नगराध्यक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त करत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणी केली.
यावर अभियंता दिनेश सिडाम यांनी आवश्यक तांत्रिक कामांना गती देऊन शहरातील वीजपुरवठा अधिक स्थिर आणि सुरळीत करण्यासाठी तातडीने कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.
या प्रसंगी पाणीपुरवठा सभापती पद्मा भगवान पिल्लीवार, नगरसेवक रंजीत नागेश्वर गागापुरवार, लोकमतचे पत्रकार नागभूषण चकिनारपूवार, सामाजिक कार्यकर्ते भगवान पिल्लीवार, तसेच महावितरणचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नगराध्यक्ष पद्मा भोगे म्हणाल्या, “सिरोंचा शहरातील नागरिकांना अखंडित, दर्जेदार आणि सुरक्षित वीजपुरवठा मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. नागरिकांना वारंवार होणारा त्रास सहन करावा लागू नये, यासाठी नगरपंचायत सातत्याने पाठपुरावा करणार असून महावितरणने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात.”
सिरोंच्यातील वारंवारच्या वीज समस्यांवर आता महावितरण किती वेगाने आणि प्रभावीपणे कार्यवाही करते, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.
