शांततेचा पुरस्कार की खाणसम्राटांचा गौरव? गडचिरोलीच्या जखमांवर पुरस्काराची फुंकर!
जल, जंगल, जमीन आणि ग्रामसभांच्या अधिकारांवर प्रश्नचिन्ह; खाण उद्योगाशी संबंधित व्यक्तीच्या सन्मानावर प्रा. अनिल डी. होळी यांचा परखड सवाल
गडचिरोली | प्रतिनिधी : गिरीश डी. नरोटे
गडचिरोली जिल्हा आज औद्योगिकीकरणाच्या नव्या पर्वाकडे वाटचाल करत असल्याचे चित्र उभे केले जात आहे. मात्र, या विकासाच्या घोषणांमागे आदिवासींचे जल, जंगल आणि जमिनीचे अधिकार, पर्यावरणाचे संरक्षण, ग्रामसभांचे घटनात्मक अधिकार आणि शेतकऱ्यांच्या जमिनींचा प्रश्न अद्याप कायम आहे. अशा परिस्थितीत खाण उद्योगाशी संबंधित लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांना ‘ग्लोबल पीस ऑनर्स २०२६’ पुरस्कार प्रदान करण्यात आल्याने जिल्ह्यातील विकासाच्या मॉडेलवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
प्रा. अनिल डी. होळी यांनी या पुरस्काराच्या निवडीवर आणि त्यामागील निकषांवर प्रश्न उपस्थित करत, “गडचिरोलीला शांततेच्या पुरस्कारांपेक्षा स्थानिक जनतेच्या हक्कांचा न्याय हवा आहे,” अशी परखड भूमिका मांडली आहे.
२१ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित कार्यक्रमात दिव्यज फाउंडेशनच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बी. प्रभाकरन यांचा गौरव करण्यात आला. ही संस्था अमृता देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केली असल्याचा उल्लेख करत प्रा. होळी यांनी पुरस्काराच्या पारदर्शकतेबाबत आणि निवड प्रक्रियेबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे.
पालकमंत्रिपद आणि गडचिरोलीच्या औद्योगिकीकरणाचा प्रश्न
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद स्वीकारल्यानंतर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गडचिरोलीला देशातील महत्त्वाचे स्टील हब बनविण्याची भूमिका सरकारकडून मांडली जात आहे. मात्र, या औद्योगिकीकरणात स्थानिक आदिवासी समाजाचे हित, पर्यावरण आणि ग्रामसभांचे अधिकार यांना किती प्राधान्य दिले जात आहे, असा सवाल प्रा. होळी यांनी उपस्थित केला आहे.
सुरजागड ते झेंडेपार : खाण प्रकल्पांभोवती प्रश्न कायम
सुरजागड लोहखनिज प्रकल्पामुळे जिल्ह्यात औद्योगिक हालचाली वाढल्या आहेत. मात्र, हेडरी, बांदे आणि मल्लमपाड परिसरातील नागरिकांकडून पाणी, धूळ, प्रदूषण आणि आरोग्यविषयक समस्या मांडल्या जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. झेंडेपारसह अन्य प्रस्तावित खाण प्रकल्पांमुळे जंगल, शेती आणि पारंपरिक उपजीविकेवर होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबतही चिंता व्यक्त होत आहे.
विकासाच्या नावाखाली स्थानिकांच्या जीवनमानावर परिणाम होत असेल, तर अशा प्रकल्पांचे सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्यमापन पारदर्शकपणे झाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
विमानतळ आणि एमआयडीसीसाठी जमीन संपादनाचा वाद
भेंडाळा परिसरातील १४ गावे, येणापूर-जयरामपूर परिसरातील १३ गावे तसेच चामोर्शी तालुक्यातील प्रस्तावित पोलाद प्रकल्पासाठी जमीन संपादनाचा विषय चर्चेत आहे. गडचिरोली विमानतळासाठी शिरपूर चक, गुरुवळा, हिरापूर आणि राखी या गावांतील सुमारे ३११.८१ हेक्टर जमीन संपादनाच्या प्रस्तावावरूनही शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
जमीन संपादनाच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केल्याचा संदर्भ देत, विकास प्रकल्प राबविताना शेतकरी आणि ग्रामस्थांची संमती, पुनर्वसन आणि योग्य मोबदला यांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे प्रा. होळी यांनी नमूद केले.
खनिज संपत्तीचा महसूल स्थानिकांच्या विकासासाठी कुठे?
गडचिरोलीतून मोठ्या प्रमाणावर लोहखनिजाचे उत्खनन होत असताना खाण महसूल, रॉयल्टी आणि जिल्हा खनिज प्रतिष्ठान (DMF) निधीचा प्रत्यक्ष लाभ दुर्गम भागातील नागरिकांना किती मिळत आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
आजही जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये रस्ते, पूल, पिण्याचे पाणी, आरोग्यसेवा आणि शिक्षणाच्या मूलभूत सुविधा अपुऱ्या आहेत. त्यामुळे खाण महसूल, DMF निधी, मंजूर कामे, खर्च आणि पूर्ण झालेल्या विकासकामांचा तपशील सरकारने सार्वजनिक करावा. यासाठी जिल्ह्याची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची मागणी प्रा. होळी यांनी केली आहे.
पुरस्काराच्या निवड प्रक्रियेवर पारदर्शकतेची मागणी
उद्योगपतींचा गौरव करण्याला विरोध नसून, पुरस्कार देण्यापूर्वी संबंधित उद्योगाच्या सामाजिक योगदानाचा, पर्यावरणीय परिणामांचा, स्थानिकांच्या तक्रारींचा आणि ग्रामसभांच्या भूमिकेचा स्वतंत्र अभ्यास करण्यात आला होता का, याची माहिती सार्वजनिक व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच पुरस्काराचे निकष काय होते, निवड प्रक्रिया कोणी राबवली आणि त्याची स्वतंत्र पडताळणी झाली होती का, याबाबत संबंधित संस्थेने स्पष्टीकरण द्यावे, असेही प्रा. होळी यांनी म्हटले आहे.
गडचिरोलीला पुरस्कारांपेक्षा न्यायाची गरज!
पेसा कायदा १९९६ आणि वनहक्क कायदा २००६ अंतर्गत ग्रामसभांना मिळालेल्या अधिकारांची प्रभावी अंमलबजावणी, आदिवासींच्या जमिनींचे संरक्षण, शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन विकास प्रकल्पांची अंमलबजावणी, खाणप्रभावित गावांना निधीचा न्याय्य लाभ आणि पर्यावरणाचे संवर्धन या बाबींवर सरकारने ठोस कृती करावी, अशी अपेक्षा प्रा. अनिल डी. होळी यांनी व्यक्त केली आहे.
“गडचिरोलीच्या जनतेला आता पुरस्कारांच्या जाहिराती नकोत; त्यांच्या जल, जंगल, जमीन आणि विकास निधीचा हिशेब हवा आहे. विकासाच्या व्यासपीठांवरून दिल्या जाणाऱ्या घोषणांचा लाभ दुर्गम भागातील शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचला पाहिजे,” असा स्पष्ट संदेश त्यांनी आपल्या लेखातून दिला आहे.
आता या उपस्थित प्रश्नांवर शासन, संबंधित उद्योगसमूह आणि पुरस्कार प्रदान करणारी संस्था काय भूमिका मांडतात, याकडे गडचिरोलीकरांचे लक्ष लागले आहे.
