मुख्यमंत्र्यांच्य हस्ते उद्घाटन झालेला बांडे नदीवरील पूल मुसळधार पावसात वाहून गेला; कोरणार (कोठी) ग्रामस्थांची संतप्त प्रतिक्रिया
प्रतिनिधी |गिरीश नरोटे एटापल्ली
एटापल्ली तालुक्यातील मौजा कोरणार (कोठी) येथील बांडे नदीवरील फुल/काजवा पूल गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाहून गेल्याची गंभीर घटना घडली आहे. विशेष म्हणजे, या पुलाचे उद्घाटन मा. मुख्यमंत्री तसेच स्थानिक आमदार यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात करण्यात आले होते. मात्र, अल्पावधीतच पूल वाहून गेल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
पूल वाहून गेल्यामुळे परिसरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. शालेय विद्यार्थी, शेतकरी, रुग्ण तसेच सर्वसामान्य नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. दुचाकी, चारचाकी तसेच इतर वाहनांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे संताप व्यक्त करत, या पुलाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, तसेच सुरक्षित पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी संबंधित कामाच्या दर्जाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
आता प्रशासन या गंभीर समस्येकडे किती तत्परतेने लक्ष देते आणि कोरणार (कोठी) येथील नागरिकांच्या वाहतुकीची अडचण किती लवकर दूर करते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
