रामायपेटा ग्रामस्थांचा संताप अनावर!
दोन दिवसांपासून मुख्य रस्त्यावर झाड आडवे; ६-७ वर्षांपासून नळयोजना बंद, शाळेत शौचालयाचा अभाव – प्रशासन झोपेत?
प्रतिनिधी | गिरीश नरोटे |अहेरी
दि. ३१ जुलै २०२६ : ग्रामपंचायत किष्टापूर (वेल) अंतर्गत येणाऱ्या मौजा रामायपेटा येथे नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मुख्य रस्त्यावर मोठे झाड कोसळून वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. या रस्त्यावरून शालेय विद्यार्थी, शेतकरी व ग्रामस्थांची सतत ये-जा असतानाही संबंधित विभागाने अद्याप झाड हटविण्याची कोणतीही कार्यवाही केली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याच गावात ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना (२०१७-१८) तसेच जल जीवन मिशन अंतर्गत घराघरांत नळजोडणी करण्यात आली. मात्र गेल्या ६ ते ७ वर्षांपासून नळातून पाण्याचा एक थेंबही आलेला नाही. शासनाच्या लाखो रुपयांच्या योजनेचा लाभ नागरिकांना मिळत नसल्याने ही योजना केवळ कागदावरच असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या गंभीर समस्यांबाबत ग्रामसेवक श्री. यादव गुळे यांना अनेक वेळा तोंडी सूचना देण्यात आल्या. तसेच २५ जुलै रोजी वृत्तप्रसार माध्यमातून बातमी प्रसिद्ध करून आणि दूरध्वनीवर संपर्क साधूनही त्यांनी “उद्या येऊन पाहणी करतो,” असे आश्वासन दिले. मात्र आजपर्यंत त्यांनी गावाला भेट दिली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
दरम्यान, गावातील जिल्हा उच्च प्राथमिक शाळेत शौचालयाची सुविधा नसल्यामुळे विद्यार्थी तलाव परिसरात जाण्यास भाग पडतात. याच कारणामुळे गेल्या महिन्यात एका विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. इतकी गंभीर घटना घडूनही संबंधित प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
ग्रामस्थांनी शासन व प्रशासनाला इशारा देत मुख्य रस्त्यावरील झाड तात्काळ हटविणे, बंद पडलेली नळयोजना सुरू करणे, शाळेत शौचालयाची व्यवस्था करणे आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा येत्या काही दिवसांत तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
प्रश्न उपस्थित होतो…
वारंवार तक्रारी करूनही अधिकारी वर्ग सुस्त का?
शासनाच्या लाखो रुपयांच्या योजना फक्त कागदावरच राहणार का?
रामायपेटा ग्रामस्थांना न्याय कधी मिळणार?
