कोठी गावात वाढीव वीज बिलांचा प्रश्न गंभीर; ग्रामस्थांचे महावितरणकडे निवेदन
₹300 ते ₹1,000 चे बिल थेट ₹5,000 ते ₹16,000 पर्यंत; मीटर रीडिंगची सखोल तपासणी करण्याची मागणी
त्रिवेणी न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी : गिरीश नरोटे
भामरागड | गडचिरोली
भामरागड : तालुक्यातील ग्रामपंचायत कोठी येथील नागरिकांना अचानक वाढून आलेल्या वीज बिलांमुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. या गंभीर समस्येबाबत ग्रामस्थांनी महावितरणच्या उपविभागीय कार्यालय, भामरागड येथे धाव घेत निवेदन सादर केले. तसेच तहसील कार्यालय, भामरागड येथेही निवेदन देऊन या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी करण्यात आली.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी दर महिन्याला साधारण ₹300, ₹800 किंवा ₹1,000 पर्यंत येणारे वीज बिल अचानक काही ग्राहकांना ₹5,000, ₹7,000, ₹14,000 आणि तब्बल ₹16,000 पर्यंत आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये चिंता आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कमी वीज वापर, तरीही शेकडोंचे बिल?
काही घरांमध्ये केवळ दोन वीज दिवे अथवा बल्बचा वापर होत असून नियमितपणे वीज बिल भरले जात असतानाही सुमारे ₹900 चे बिल येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. प्रत्यक्ष वीज वापर कमी असताना बिलाची रक्कम एवढी का वाढत आहे, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
मीटर रीडिंग न झाल्याचे महावितरणचे स्पष्टीकरण
वाढीव बिलांबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी, मागील महिन्यात काही ग्राहकांचे मीटर रीडिंग योग्य पद्धतीने घेता आले नसल्याने त्या कालावधीतील वीज वापराची रक्कम पुढील बिलात समाविष्ट झाल्याचे सांगितल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले आहे.
मात्र, अचानक हजारो रुपयांची बिले आल्याने बिलिंग प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रत्येक ग्राहकाच्या मीटरची रीडिंग, मागील वीज वापर, बिलिंग कालावधी आणि बिलातील आकार यांची सविस्तर तपासणी करून वास्तविक परिस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
स्मार्ट मीटरबाबतही ग्रामस्थांमध्ये संभ्रम
दरम्यान, स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरही ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे. स्मार्ट मीटर बसविल्यानंतर भविष्यात वीज बिलात अनावश्यक वाढ होऊन ग्राहकांवर आर्थिक भार पडणार नाही ना, अशी शंका काही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
“आम्हाला स्मार्ट मीटर नको. पूर्वीचे जुने मीटरच कायम ठेवण्यात यावेत,” अशी भूमिका काही ग्रामस्थांनी मांडली आहे. स्मार्ट मीटरची कार्यपद्धती, बिलिंग प्रक्रिया तसेच ग्राहकांना होणारे फायदे व संभाव्य अडचणी याबाबत प्रशासनाने स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
वाढीव बिलांची चौकशी करून तातडीने दिलासा द्या
कोठी गावातील प्रत्येक संबंधित ग्राहकाच्या मीटर रीडिंगची प्रत्यक्ष तपासणी करून मागील बिलांशी तुलना करावी, चुकीचे किंवा वाढीव बिल आढळल्यास त्यात तातडीने दुरुस्ती करावी आणि ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी महावितरण प्रशासनाकडे केली आहे.
वाढीव वीज बिलांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या घरगुती आर्थिक नियोजनावर मोठा परिणाम होत असल्याने महावितरण प्रशासनाने कोठी गावातील या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने योग्य तोडगा काढावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
आता महावितरण आणि तहसील प्रशासन या निवेदनाची कितपत दखल घेते आणि वाढीव वीज बिलांच्या प्रश्नावर कोणती कार्यवाही करते, याकडे कोठी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
