आदिवासी विकास विभागाच्या परिपत्रकाविरोधात अहेरीत आदिवासी एकता मंचाचा एल्गार
वसतिगृहातील आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा; राज्यपालांना निवेदन, सचिव वाघमारे यांच्या कथित वक्तव्याचा निषेध
अहेरी | प्रतिनिधी तिरुपति मडावी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांवर परिणाम करणाऱ्या शासन परिपत्रकाविरोधात तसेच आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी आदिवासी एकता मंच, अहेरी विधानसभा क्षेत्र आक्रमक झाला आहे. राज्यातील शासकीय आदिवासी वसतिगृहातील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांना मंचाने जाहीर पाठिंबा दिला असून, विविध मागण्यांचे निवेदन महामहीम राज्यपालांना अप्पर जिल्हाधिकारी, अहेरी यांच्या मार्फत सादर करण्यात आले.
राज्यातील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थी संविधानिक शैक्षणिक अधिकार, मूलभूत सुविधा आणि इतर रास्त मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत. या पार्श्वभूमीवर अहेरी विधानसभा क्षेत्रातील आदिवासी विद्यार्थी व संघटनांनी एकत्र येत शासनाचे लक्ष या प्रश्नांकडे वेधले.
यावेळी आदिवासी विकास विभागाचे सचिव वाघमारे यांच्या कथित वादग्रस्त वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला. आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी शासनाने पाठ्यपुस्तके, गणवेश, वसतिगृह सुविधा, दर्जेदार भोजन तसेच आश्रमशाळांमध्ये आवश्यक मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
प्रमुख मागण्या
शासकीय आश्रमशाळांमधील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत.
शैक्षणिक वर्ष सुरू होताच आदिवासी वसतिगृहे सुरू करण्यात यावीत.
५० टक्के आदिवासी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतनिहाय गावांमध्ये वर्ग-३ व वर्ग-४ पदांची भरती पेसा कायद्यानुसार करण्यात यावी.
आश्रमशाळांमधील भोजन व्यवस्थेची नियमित तपासणी करण्यात यावी.
विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक व निवासी सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यात याव्यात.
या आंदोलनात आदिवासी एकता मंच समितीचे कैलाश कोरेत, बालाजी गावडे, प्रा. रमेश हलामी, अश्विन मडावी, नागेश मडावी, संभाजी हिचामी, मारोती पल्लो, मांतय्या आत्राम, गुरुदास मडावी, उमेश पोरतेट, नारायण कुमरे, विनायक आलाम, राहुल मडावी, रितेश गावडे, योगेश मडावी, मुकेश पोरतेट, सुगद उराडे, तरुण पेंदाम, सूरज नैताम, रोहित येलम, राजेश उसेंडी, आकाश आत्राम, सुमित बोगामी, नितीन कोरेत, उमेश वेलादी, राजेश सोयाम, श्रेयश मडावी, विक्की नैताम, संतोष कोरेत, रोहित नरोटे, संतोष कुळमेथे, विजय मडावी, बादल कुरसाम, अंकुश मडावी, शैलेश आत्राम, सूर्यदास सोयाम, करण कुमरम, दिनेश नुम्मडी, रमेश मडावी यांच्यासह शेकडो विद्यार्थी सहभागी झाले.
“आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्यांचे तातडीने निराकरण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” असा इशारा आदिवासी एकता मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.
