*आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांची पाहणी; स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन…*
*-नंदू भाऊ नरोटे यांचा सिरोंचा तालुका दौरा; विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन…*
प्रतिनिधी: सुगत उराडे
30 ऑगस्ट 2026
सिरोंचा : आदिवासी विद्यार्थी संघटना विदर्भ, नागपूरचे सरसेनापती नंदू भाऊ नरोटे यांनी नुकताच सिरोंचा तालुक्याचा दौरा करून बामणी व सिरोंचा येथील शासकीय आदिवासी वसतिगृहांची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच धर्मपुरी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेलाही भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून पुढे यावे, तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करून प्रशासकीय सेवेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या वतीने दि. १८ ते २३ ऑगस्ट २०२६ या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळा तसेच आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेच्या A, B, C, D तसेच एमपीएससी व यूपीएससी परीक्षांसंदर्भात मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची दिशा मिळावी, हा उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
सिरोंचा तालुक्यातील विविध वसतिगृहांना भेट देताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधा, राहण्याची व्यवस्था, उपलब्ध शैक्षणिक साधने तसेच विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींबाबतही माहिती घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या अडचणी व अपेक्षा यावेळी उपस्थित मान्यवरांसमोर मांडल्या.
*दरम्यान,धानोरा तालुक्यातील जपतलाई येथे घडलेल्या घटनेबद्दल नंदू भाऊ नरोटे यांनी दुःख व्यक्त केले.* भविष्यात अशा प्रकारच्या घटना कुठेही घडू नयेत,यासाठी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत अधिक दक्षता घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची व त्यांच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी शिक्षक आणि संबंधित प्रशासनाची असून, त्याबाबत आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी संबंधितांना केले.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगाम,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष रवि सुलतान,वेंकटपूर ग्राम पंचायतचे सरपंच अजय आत्राम,सिरकोंडा ग्राम पंचायतीचे सरपंच लक्ष्मण गावडे,गर्कापेठा ग्राम पंचायतीचे सरपंच सूरज गावडे, कोपला ग्राम पंचायतीचे सरपंच सुरेश मडावी,दुर्गेश लांबडी,वासू सफाट,सिनू दुर्गम,लक्ष्मण बोले,सारय्या दुर्गम,अशोक इंगली,गणेश बचलकुरा,तिरुपती मारभोयना, सिनू गयकोटी,लावण पागे,गणेश रच्चावार,सिनू गोडम,बापूराव कुंमरी,यांच्यासह आदिवासी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी,शिक्षक,विद्यार्थी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
*आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, योग्य मार्गदर्शन आणि स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक संधी उपलब्ध करून देण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.*
