*खोटे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप; प्रशांत रामभाऊ भागवत यांच्यावर कारवाईची मागणी..!*
_*अहेरी विधानसभा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष किशोर करमे यांची तक्रार; अपर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चौकशीचे निर्देश..!*_
गडअहेरी-बामणी, ता. अहेरी येथील जमीन व वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्रासंदर्भात प्रशांत रामभाऊ भागवत यांनी कथितरीत्या खोटे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोष आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अहेरी विधानसभा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष *किशोर करमे* यांनी केली आहे.
किशोर करमे यांनी याबाबत १६ सप्टेंबर २०२६ रोजी अहेरी येथे अर्जाद्वारे तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, गडअहेरी-बामणी येथे सर्वे क्रमांक ७७, क्षेत्रफळ १.३८ हेक्टर जमीन असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीत २०१८-१९ ते २०२०-२१ या कालावधीतील वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्रांबाबत आक्षेप नोंदविण्यात आला आहे. प्रत्यक्ष उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न दर्शवून प्रमाणपत्र प्राप्त केल्याचा तसेच पत्नीचे उत्पन्न वार्षिक उत्पन्नामध्ये समाविष्ट न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
दरम्यान, या तक्रारीची दखल घेत अपर जिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी, अहेरी यांच्या कार्यालयाने २२ सप्टेंबर २०२६ रोजी अहेरीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी पत्र पाठविले आहे.
तक्रारीतील आरोपांची पडताळणी करून संबंधित कागदपत्रे व उत्पन्न प्रमाणपत्रांची तपासणी करण्याची प्रक्रिया आता प्रशासनाकडून केली जाणार आहे. तहसीलदार, अहेरी यांनी प्रमाणपत्रे निर्गमित केल्याच्या पार्श्वभूमीवर प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहे.
अपर जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित अधिकाऱ्यांना प्रकरणाची कार्यवाही करून अहवाल यथाशीघ्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, प्रशांत रामभाऊ भागवत यांच्यावरील आरोपांची अधिकृत चौकशी व संबंधित कागदपत्रांची पडताळणी अद्याप होणे बाकी आहे. त्यामुळे चौकशीअंती नेमके तथ्य काय समोर येते आणि पुढील कायदेशीर कारवाईचे स्वरूप काय असेल, हे स्पष्ट होणार आहे.
