*गडचिरोलीत सराफा व्यावसायिकावर मिरचीपूड फेकून चोरीचा प्रयत्न; २४ तासांत तीन संशयित आरोपींना अटक*
जिल्हा विशेष प्रतिनिधी उमेश गझलपेल्लीवार
रात्रीच्या सुमारास दुकान बंद करून घराकडे जाणाऱ्या एका सराफा व्यावसायिकाच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून सोन्या- चांदीच्या दागिन्यांची जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन संशयित आरोपींना गडचिरोली पोलिसांनी अवघ्या २४ तासांत जेरबंद केले आहे. स्थानिक गुन्हे शाखा व गडचिरोली पोलीस ठाण्याच्या पथकांनी तांत्रिक पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि गोपनीय माहितीच्या आधारे ही धडक कारवाई केली.
सुरेश बाबूराव भोजापुरे (५०) यांचे गडचिरोलीच्या सराफा बाजारात ‘ऐश्वर्या ज्वेलर्स’ नावाचे दुकान आहे. ३१ ऑगस्टच्या रात्री ते दुकान बंद करून मोटारसायकलने घरी जात असताना, गडचिरोली- चामोर्शी मार्गावरील जंगल कामगार सोसायटीच्या कार्यालयासमोर दुचाकीवरील अज्ञात व्यक्तींनी त्यांना जबरदस्तीने अडविले. त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर मिरची पावडर फेकून दागिन्यांचा डबा हिसकावून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, भोजापुरे यांनी प्रसंगावधान राखून आरडाओरड केल्यामुळे आरोपी अंधाराचा फायदा घेत तिथून पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी तत्परता दाखवत तात्काळ गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे हलवली. पोलीस पथकांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आणि गोपनीय माहितीच्या साहाय्याने शोध घेऊन तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले. विशाल घनश्याम देशमुख (३६), रा. रामनगर, गडचिरोली,
राकेश विजय गिरसावळे (२५), रा. कन्नमवार नगर, गडचिरोली, शहबाज सलाम शेख (३१), रा. विवेकानंद नगर, गडचिरोली चौकशीदरम्यान सोनू खांडेकर (२४), रा. विवेकानंद नगर याचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आले आहे.
अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना २ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील फरार आरोपी सोनू खांडेकर याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
*उमेश गझलपेल्लीवार*
विशेष प्रतिनिधी गडचिरोली
