श्रमदानातुन रस्ता दुरुस्ती: राज्य महामार्ग २६३ च्या निकृष्ट अवस्थेमुळे चोखेवाडावासीयांचा संताप
एटापल्ली ( प्रतिनिधी: गिरीष नरोटे):
तालुक्यातील मौजा चोखेवाडा येथे प्रशासकीय अनास्थेचा एक गंभीर प्रकार समोर आला आहे. तालुका मुख्यालयापासून सुमारे ३३ किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली होती. रस्ता पूर्णपणे चिखलमय झाल्याने वाहतूक बंद पडण्याच्या मार्गावर होती. अखेर प्रशासनाच्या मदतीची वाट न पाहता आज, बुधवार दिनांक ०२ सप्टेंबर २०२६ रोजी, ग्रामस्थांनी एकत्र येत स्वतः श्रमदानातून रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून रस्ता वाहतुकीयोग्य केला.
विशेष आणि संतापजनक बाब म्हणजे हा रस्ता साधा ग्रामपंचायत रस्ता नसून ‘राज्य महामार्ग क्रमांक २६३’ चा भाग आहे. तब्बल १० ते १२ वर्षांपूर्वी या महामार्गाच्या कामाला मंजुरी मिळालेली असतानाही आजतागायत चोखेवाडा गावापर्यंतचे काम पूर्ण झालेले नाही.
प्रशासनाचा संथ कारभार चव्हाट्यावर
गेल्या एका दशकापासून मंजूर असलेल्या रस्त्याचे काम रडतखडत सुरू असल्याने, शासन आणि प्रशासन ग्रामीण भागातील विकासाबाबत किती ‘गंभीर’ आहे, याचे ज्वलंत उदाहरण चोखेवाडा येथे पाहायला मिळत आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊनही जर रस्ता पूर्ण होत नसेल आणि गावकऱ्यांनाच हातात फावडे-टिकाव घेऊन रस्ता दुरुस्त करावा लागत असेल, तर हा प्रशासकीय गतीचा आणि विकासाच्या दाव्यांचा फुगा फुटल्याचेच स्पष्ट होते.
गावकऱ्यांची आक्रमक मागणी
रस्त्यावर चिखल साचल्याने शालेय विद्यार्थी, रुग्ण आणि दैनंदिन प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. ऐन आणीबाणीच्या वेळी रुग्णवाहिका गावात पोहोचणेही कठीण झाले आहे. या त्रासाला कंटाळूनच चोखेवाडा ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या गावकऱ्यांनी स्वखर्चाने व श्रमदानाने खड्डे भरले.
”१०-१२ वर्षांपासून रस्त्याचे काम रखडले आहे. लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाचे अधिकारी केवळ आश्वासने देतात. आता प्रशासनाला जाग कधी येणार?” असा संतप्त सवाल चोखेवाडा येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने या राज्य महामार्गाचे रखडलेले काम तात्काळ पूर्ण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
