जपतलई आश्रमशाळेतील सर्पदंशाच्या घटनेने दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर
दीपिका एतवा लकडा व सुश्मिता सरोनित मंडल यांच्या कुटुंबीयांची सावित्रीच्या लेकी विकास संस्था व दक्षता समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली सांत्वनपर भेट
प्रतिनिधी : सुगत उराडे
दि. २ सप्टेंबर २०२६
एटापल्ली : जपतलई येथील आश्रमशाळेत सर्पदंशाच्या दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कु. दीपिका एतवा लकडा (जवेली) तसेच सुश्मिता सरोनित मंडल (मेंढरी) यांच्या कुटुंबीयांची एटापल्ली येथील सावित्रीच्या लेकी विकास संस्था व दक्षता समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांत्वनपर भेट घेतली.
या भेटीदरम्यान पदाधिकाऱ्यांनी शोकाकुल कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांच्या दुःखात सहभागी होत मनापासून सांत्वन केले. या काळजाला चटका लावणाऱ्या दुर्दैवी घटनेबद्दल उपस्थितांनी तीव्र दुःख व्यक्त केले. दुःखाच्या या कठीण प्रसंगी कुटुंबीयांना धीर देत त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या वेदनादायी घटनेने दोन्ही कुटुंबांवर मोठे संकट कोसळले असून, निष्पाप विद्यार्थिनींच्या मृत्यूमुळे परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे. अशा दुःखद प्रसंगी कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहून त्यांना आधार देणे हीच सामाजिक बांधिलकी असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
यावेळी पौर्णिमाताई श्रीरामवार, अध्यक्ष, सावित्रीच्या लेकी विकास संस्था, एटापल्ली; सुनिताताई चांदेकर, अध्यक्ष, दक्षता समिती, एटापल्ली यांच्यासह गुलशन शेख, कलिमा शेख, शालिनी नैताम, वंदना कुकलवार, रेहाना शेख, बेबीताई लेकामी, वंदना उपग्नतलावार, बेबी हेडो, जया पुडो, छाया जेट्टी, वैशालीताई सोनटक्के, मनीषा नाडमवार आदी उपस्थित होते.
