*गडचिरोलीत धावत्या ST बसचे चाक निखळणे म्हणजे प्रवाशांच्या जीवाशी खेळ – सरकारचा निष्काळजीपणा*
*20 दिवसात दुसरी घटना, प्रशासन झोपलंय का? – भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर)*
गडचिरोली, दि. ४: गडचिरोली जिल्ह्यात धावत्या एसटी बसचे चाक निखळल्याची घटना ही अत्यंत गंभीर आणि संतापजनक आहे. 20 दिवसांत दुसऱ्यांदा हीच घटना घडते म्हणजे हे अपघात नाहीत, तर सरकार आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे घडलेला प्रवाशांच्या जीवाशी खेळ आहे, अशी आक्रमक प्रतिक्रिया माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर) यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत. त्यांनी गडचिरोलीला स्टील हब करण्याच्या मोठ्या गोष्टी सांगितल्या, पण प्रत्यक्षात गडचिरोलीच्या गरीब आदिवासी जनतेला साधी सुरक्षित एसटी बस सुद्धा हे सरकार देऊ शकत नाही. रस्त्यांची अवस्था बिकट आणि त्यात भंगार बसेस रस्त्यावर धावत आहेत.
आज सुदैवाने जीवितहानी झाली नाही, पण उद्या मोठा अपघात झाला तर याला जबाबदार कोण? परिवहन मंत्री आणि पालकमंत्री यांनी याचे उत्तर द्यावे.
माजी जिल्हापरिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर) यांनी प्रसिद्धिपत्रकातून मागण्या मांडल्या गडचिरोली आगारातील सर्व बसेसची तात्काळ तांत्रिक तपासणी करण्यात यावी.
भंगार झालेल्या बसेस तात्काळ भंगारात काढून नव्या बसेस जिल्ह्याला द्याव्यात.
या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी.
जर यावर तात्काळ कारवाई झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या वतीने आम्ही एसटी महामंडळाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
