आलापल्ली–सिरोंचा महामार्गाच्या प्रलंबित कामासाठी गडकरींची भेट
हर्षवर्धन बाबा आत्राम व डॉ. मिताली अक्का आत्राम यांनी मांडले अहेरी विधानसभा क्षेत्रातील रस्ते प्रश्न
नागपूर : अहेरी विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रीय महामार्गांच्या प्रलंबित कामांबाबत हर्षवर्धन बाबा आत्राम व डॉ. मिताली अक्का आत्राम यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेतली.
माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या भेटीत आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित करण्यात आला.
या मार्गाचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने नागरिकांना वाहतूक, आरोग्य, शिक्षण आणि दळणवळणाच्या सुविधांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी हर्षवर्धन बाबा आत्राम व डॉ. मिताली अक्का आत्राम यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे केली.
तसेच, आलापल्ली–सिरोंचा मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी गडकरी यांनी या भागाला भेट द्यावी, अशी विनंतीही करण्यात आली.
या चर्चेदरम्यान नितीन गडकरी यांनी संबंधित प्रश्नांवर आवश्यक प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती हर्षवर्धन बाबा आत्राम व डॉ. मिताली अक्का आत्राम यांनी दिली.
या भेटीमुळे अहेरी विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रीय महामार्गांच्या प्रलंबित प्रश्नांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
