जीवनगट्टा येथे प्रशासनाचा भोंगळ कारभार: भरदिवसा पथदिवे सुरू, तर रात्री अंधाराचे साम्राज्य
एटापल्ली (तालुका प्रतिनिधी: गिरीष डी. नरोटे):
एटापल्ली नगरपंचायत हद्दीतील मौजा जीवनगट्टा येथे प्रशासकीय दुर्लक्ष आणि निष्काळजीपणाचा अनोखा प्रकार समोर आला आहे. गावात रात्र झाली की विजेचा प्रकाश कमी होतो आणि भरदिवसा मात्र खांबांवरील दिवे धगधगत असतात. या उलट्या कारभारामुळे नगरपंचायत प्रशासनाविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
गावातील मुख्य चौक आणि गर्दीच्या ठिकाणी उभारलेल्या मोठ्या हायमॅस्ट (हायपोल) खांबांवर सहा दिवे असणे आवश्यक आहे. मात्र, सद्यस्थितीत तिथे केवळ एकच बल्ब सुरू असून उर्वरित पाच बल्ब गेल्या अनेक दिवसांपासून बंद पडलेले आहेत. ज्या खांबांवर दिव्यांची नितांत गरज आहे, तिथे अंधार पसरलेला असतो. या गंभीर समस्येबाबत जीवनगट्टावासीयांनी नगरपंचायत कार्यालयात रीतसर तक्रार देऊन तब्बल दोन महिन्यांचा काळ लोटला आहे. मात्र, अद्याप प्रशासनाने याकडे साधे लक्षही दिलेले नाही.
”दोन महिने उलटूनही पथदिव्यांची सोय न होणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. शासन आणि प्रशासन नेमके गाढ झोपेत आहे की काय?” असा संतप्त सवाल जीवनगट्टा येथील नागरिक विचारत आहेत. नगरपंचायतीच्या या प्रशासकीय अनास्थेमुळे स्थानिक जनतेत प्रचंड नाराजी पसरली असून, मुख्य चौकातील व गल्लीबोळांतील बंद पडलेले हायमॅस्ट व पथदिवे तात्काळ दुरुस्त करून रात्रीच्या वेळी योग्य प्रकाशयोजना करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
