गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिरोंचा पोलिसांची शांतता समिती बैठक
शांतता, सामाजिक उपक्रम व सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे पोलिसांचे आवाहन
सिरोंचा:
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिरोंचा पोलीस स्टेशन येथे शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. गणेशोत्सव अत्यंत शांततेत, उत्साहात आणि सामाजिक सलोखा राखून साजरा करण्याबाबत या बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांना व नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
या बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक (अहेरी) हर्षवर्धन बी. जे., उपविभागीय पोलीस अधिकारी (सिरोंचा) समाधान पाटील, पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुधाळ, नायब तहसीलदार पारधी तसेच महावितरण विभागाचे अभियंता कांकाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे व पोलिसांचे आवाहन:
सामाजिक उपक्रमांना प्राधान्य: पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुधाळ यांनी गणेश मंडळांना केवळ मनोरंजनात्मक कार्यक्रम न घेता, गरीब व गरजू नागरिकांना मदत करणाऱ्या सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले.
नियमांचे पालन व सुरक्षा: उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील यांनी डीजेचा वापर टाळून शासकीय नियमांचे पालन करण्याचे स्पष्ट केले. सुरक्षेच्या दृष्टीने मंडपांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच, पोलिसांतर्फे दररोज मंडळांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला जाईल.
वाहतूक व विसर्जन सुरक्षा: विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहनांचा वापर सुरक्षिततेने करावा, कोणतीही दुर्घटना घडणार नाही याची दक्षता घ्यावी आणि शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांना वाहतुकीचा त्रास होणार नाही याची काळजी मंडळांनी घ्यावी, असे निर्देश देण्यात आले.
नशामुक्त परिसर व पोलीस समन्वय: अप्पर पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बी. जे. यांनी गणेशोत्सव व आगामी नवरात्रोत्सवात परिसर नशामुक्त ठेवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. तसेच, प्रत्येक गणेश मंडळासाठी एक पोलीस अंमलदार नियुक्त करून समन्वय साधला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीच्या यशस्वी आयोजनासाठी सिरोंचा पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक, महिला उपनिरीक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले. बैठकीला सिरोंचा तालुक्यातील पोलीस पाटील, नगरसेवक, स्थानिक युवक, विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
