गडचिरोलीतील दुर्गम LKAMH रुग्णालयाची किमया: गंभीर अपघातग्रस्त बाजीराव सडमेक मृत्यूच्या दाढेतून परतले; अवघ्या ३ दिवसांत वॉकरवर उभे
विशेष वृत्त : सुगत उराडे
गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम हेडरी–सुरजागड परिसरातील लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटल (LKAMH) येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने वैद्यकीय क्षेत्रातील एक अद्भूत किमया करून दाखवली आहे. अपघातात लहान आतड्याला पडलेली तीन छिद्रे आणि दोन्ही पायांची हाडे अतिगंभीर स्वरूपात मोडलेल्या ५१ वर्षीय बाजीराव सडमेक या अपघातग्रस्तावर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना नवजीवन दिले आहे. मृत्यूशी दिलेली झुंज जिंकत बाजीराव आता स्वबळावर वॉकरच्या मदतीने चालू लागले आहेत.
अत्यवस्थ स्थिती आणि संसर्गाचा गंभीर धोका
५ ऑगस्ट २०२६ रोजी बाजीराव यांना प्राथमिक आरोग्य केंद्रातून अत्यंत गंभीर आणि खालावलेल्या रक्तदाबाच्या स्थितीत LKAMH मध्ये हलवण्यात आले. तपासणीदरम्यान त्यांच्या लहान आतड्याला तीन ठिकाणी छिद्रे पडल्याचे स्पष्ट झाले. आतड्यातील घटक पोटाच्या आत झिरपून विषारी संसर्ग पसरण्याचा आणि जिवाला धोका निर्माण होण्याचा मोठा धोका होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ६ ऑगस्ट रोजी डॉक्टरांनी तातडीने पोटाची आपत्कालीन शस्त्रक्रिया करून तिन्ही छिद्रे यशस्वीपणे शिवली.
पायाचे क्लिष्ट फ्रॅक्चर अन् गुंतागुंतीवर मात
बाजीराव यांच्या दोन्ही पायांच्या हाडांचे उघडे फ्रॅक्चर झाले होते, तर उजवा पाय पूर्णपणे विकृत झाला होता. उपचारादरम्यान पायाच्या खोल रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या (DVT) तयार होण्याचा धोका निर्माण झाल्याने, डॉक्टरांनी हेपेरिनसारखी रक्त पातळ करणारी औषधे देऊन ही गुंतागुंत हाताळली.
रुग्णाची प्रकृती स्थिर झाल्यानंतर ३१ ऑगस्ट रोजी ऑर्थोपेडिक विभागाने दोन्ही पायांच्या हाडांवर एकाच टप्प्यात यशस्वी शस्त्रक्रिया करून धातूच्या रॉड्स बसवल्या.
शस्त्रक्रियेनंतर तिसऱ्याच दिवशी चालण्यास सुरुवात
शस्त्रक्रियेनंतर अवघ्या तिसऱ्याच दिवशी फिजिओथेरपी पथकाच्या मदतीने बाजीराव यांनी पायावर वजन देऊन उभे राहण्यास सुरुवात केली. जनरल सर्जरी, ऑर्थोपेडिक्स, क्रिटिकल केअर, भूलशास्त्र, मेडिसिन, नर्सिंग आणि फिजिओथेरपी या सर्व विभागांच्या उत्तम समन्वयामुळे ही अशक्य वाटणारी रिकव्हरी शक्य झाली.
”दुर्गम भागातील नागरिकांसाठी आधुनिक आरोग्य सेवा वरदान”
”दुर्गम व आदिवासी भागात उपलब्ध असलेल्या अशा अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा स्थानिक नागरिकांसाठी वरदानासारख्या आहेत. बाजीराव सडमेक यांच्यावर यशस्वी उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनापासून अभिनंदन. LKAMH रुग्णालय स्थानिकांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा देण्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहे.”
— श्री. बी. प्रभाकरन, व्यवस्थापकीय संचालक, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लि.
मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज उरली नाही
गंभीर अपघात किंवा आजार झाल्यास नेहमी नागपूर अथवा इतर मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागते, हा समज या घटनेने मोडून काढला आहे. वेळेवर मिळालेले तज्ज्ञ उपचार, अत्याधुनिक सुविधा आणि डॉक्टरांची जिद्द यामुळे हेडरीसारख्या दुर्गम भागातही बाजीराव सडमेक यांना नवजीवन मिळाले आहे.
