काप्पेवंचा येथे लस दिल्यानंतर दोन महिन्यांच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू; दोषी आरोग्य कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची पालकांची मागणी
अहेरी / काप्पेवंचा:
अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम काप्पेवंचा या माडीया (PVTG) बहुल गावात लसीकरणानंतर अवघ्या काही तासांत दोन महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत संतप्त पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. घटनेची माहिती मिळताच माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम आणि डॉ. मिताली आक्का आत्राम यांनी काप्पेवंचा गावात जाऊन पीडित तलांडी कुटुंबाची भेट घेऊन विचारपूस केली.
नक्की काय घडले?
पीडित आई सौ. सुनीता शामराव तलांडी व वडील श्री शामराव तलांडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास आरोग्य सेविका, MPW, आशा वर्कर आणि कंत्राटी आरोग्य सेवक हे चौघे घरी आले. त्यांनी दोन महिन्यांच्या बालकाला चार इंजेक्शन्स दिली आणि दोन वेगवेगळ्या बाटल्यांमधून औषध पाजले. लस दिल्यानंतर एका खाजगी किंवा सरकारी वैद्यकीय देखरेखीविना कर्मचारी लगतच्या गावी निघून गेले.
आरोग्य कर्मचारी निघून गेल्यानंतर काही तासांतच बाळाची प्रकृती बिघडली. बाळ गुंगीत गेल्यासारखे झाले आणि त्याने दूध पिणेही बंद केले. रात्री १२ वाजेच्या सुमारास बाळाची हालचाल थांबल्याचे लक्षात आल्यावर पाहिले असता त्याचा मृत्यू झाला होता.
आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा?
घटनेनंतर रात्री आरोग्य सेविकेला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही, असा आरोप कुटुंबाने केला आहे. पुढील दिवशी (८ सप्टेंबर) पालकांनी राजाराम पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. बालकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (PM) अहेरी उपजिल्हा रुग्णालयात नेताना किंवा अंत्यसंस्कारादरम्यान आरोग्य केंद्र पेरमिली अथवा उपकेंद्र कोडसेपल्ली येथील एकही अधिकारी किंवा कर्मचारी हजर नव्हता. आरोग्य विभागाच्या या असंवेदनशील आणि निष्काळजी भूमिकेबद्दल गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
चौकशी आणि निलंबनाची मागणी
या दुर्दैवी घटनेची माहिती घेताना गडचिरोली जिल्हा आरोग्य अधिकारी, अहेरी तालुका आरोग्य अधिकारी आणि राजाराम पोलीस ठाण्याचे अधिकारी उपस्थित होते. शासकीय यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळेच बाळाचा बळी गेल्याचा आरोप करत जबाबदार आरोग्य कर्मचाऱ्यांना त्वरित निलंबित करावे, त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मृत बालकाच्या पालकांनी व ग्रामस्थांनी केली आहे.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव बालाजी गावडे, अहेरी तालुकाध्यक्ष नागेश मडावी, माजी सरपंच विनायक आलाम, काप्पेवंचाचे गाव पाटील कोत्ता आत्राम, सलीम शेख, इरपा तलांडी, डॉ. गाईन, सुनील नैताम यांच्यासह तलांडी परिवार आणि काप्पेवंचा येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
