वन विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिक भयभीत; मरपलीतील तरुणाने झाडावर चढून वाचवला जीव
प्रतिनिधी गिरीश नरोटे
मरपली, कोकोबंडा, वासामुंडी, बारसेवाडा आणि मचली या परिसर आणि लगतच्या गावांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाघाची प्रचंड दहशत पसरली आहे. शनिवारी (दि. १२) मरपली येथील महेंद्र भाऊजी दुर्वा (वय २३) हा तरुण जंगलात बैल चारण्यासाठी गेला असताना त्याचा थेट वाघाशी सामना झाला. वाघाला समोर पाहताच प्रसंगावधान राखून महेंद्रने झाडावर चढून आपला जीव वाचवला आणि संपूर्ण रात्र झाडावरच काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे गुरांना चरण्यासाठी जंगलात घेऊन गेला होता. अचानक त्याच्यासमोर वाघ आला. वाघाला पाहून घाबरलेल्या महेंद्रने क्षणाचाही विलंब न लावता जवळच असलेल्या एका उंच झाडावर पळ काढला. रात्रभर वाघ आसपास फिरत असल्याने तो भीतीच्या सावटाखाली रात्रभर झाडावरच बसून राहिला.
दुसरीकडे, महेंद्र रात्र झाली तरी घरी न परतल्याने त्याचे कुटुंब आणि ग्रामस्थ काळजीत पडले. रविवारी सकाळी गावातील प्रत्येक घरातील एका व्यक्तीने एकत्र येत जंगलात शोधमोहीम राबवली. शोध घेताना महेंद्र जंगलातील एका झाडावर सुखरूप आढळून आला. गावकऱ्यांनी त्याला खाली उतरवल्यानंतर त्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला.
वन विभागाच्या कारभारावर गावकऱ्यांचा संताप
या परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून वाघाचा वावर असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. वन विभागाने त्वरित या वाघाचा बंदोबस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मरपली व परिसरातील गावकऱ्यांनी दिला आहे.
