गडचिरोलीत रंगणार पर्यटनाचा महोत्सव!
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान आयोजन; चार पर्यटन सर्किट्सच्या माध्यमातून जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना मिळणार व्यापक प्रसिद्धी
त्रिवेणी न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी : सुगत उराडे
गडचिरोली, दि. १५ सप्टेंबर : गडचिरोली जिल्ह्यातील समृद्ध निसर्गसंपदा, ऐतिहासिक वारसा आणि वैशिष्ट्यपूर्ण पर्यटनस्थळांना व्यापक प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी २३ ते २८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. पर्यटनवाढीसोबतच स्थानिक रोजगारनिर्मिती आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
पर्यटन महोत्सवाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांच्यासह वन, महसूल, पर्यटन आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
चार पर्यटन सर्किट्सच्या माध्यमातून पर्यटनवाढीला चालना
गडचिरोलीतील पर्यटनस्थळांना एकमेकांशी जोडून उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम अशा चार पर्यटन सर्किट्सच्या विकासावर भर देण्यात येणार आहे.
उत्तर सर्किटमध्ये टिपागड, मेंढालेखा, झाडापापडा आणि अरततोंडी, तर दक्षिण सर्किटमध्ये फॉसिल पार्क, कमलापूर हत्ती कॅम्प आणि सोमनूर परिसराचा समावेश करण्यात आला आहे.
पूर्व आणि पश्चिम भागातील पर्यटनस्थळांमध्ये भामरागड त्रिवेणी संगम, हेमलकसा, मार्कंडा, चिचडोह बॅरेज, चपराळा अभयारण्य तसेच धनुरा आणि सेमाना परिसराचा समावेश करण्यात आला आहे.
युवक-विद्यार्थ्यांचा सहभाग
पर्यटनस्थळांची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी युवक आणि विद्यार्थ्यांना महोत्सवाशी जोडण्यात येणार आहे. राष्ट्रीय सेवा योजना, नेहरू युवा केंद्र आणि स्थानिक महाविद्यालयांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.
यामध्ये ट्रेकिंग, नेचर वॉक, रील्स स्पर्धा, छायाचित्रण स्पर्धा आणि पर्यटनविषयक जनजागृती कार्यक्रमांचा समावेश आहे.
सिरोंच्यासह विविध भागांत नाईट कॅम्पिंग, बोटिंगचे नियोजन
गडचिरोलीच्या निसर्गसंपदेचा आणि इको-टुरिझमच्या संधींचा विचार करून सेमाना, मार्कंडा आणि सिरोंचा परिसरात नाईट कॅम्पिंग, बोटिंग तसेच सायन्स पार्क भेटीचे उपक्रम आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे साहसी, निसर्गाधारित आणि शैक्षणिक पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
सुविधा, स्वच्छता आणि सुरक्षिततेवर प्रशासनाचा भर
पर्यटन महोत्सव केवळ काही दिवसांपुरता मर्यादित न राहता जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची कायमस्वरूपी ओळख निर्माण करणारा ठरावा, यासाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे.
पर्यटनस्थळांवर स्वच्छता, सुरक्षितता, दिशादर्शक फलक, आवश्यक सुविधा आणि पर्यटकांच्या सोयीसाठी आवश्यक बाबींची पूर्तता महोत्सवापूर्वी करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.
स्थानिक सहभागातून महोत्सव यशस्वी करण्याचे आवाहन
वनविभाग आणि पर्यटन विभागाने ग्रामपंचायती, महाविद्यालये, युवक, स्वयंसेवी संस्था आणि लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून महोत्सवाचे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले.
गडचिरोलीच्या पर्यटनस्थळांना व्यापक प्रसिद्धी मिळवून देण्यासोबतच स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा महोत्सव महत्त्वपूर्ण ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
