पोलीस दादा लोरा खिडकी उपक्रमातून ‘प्रोजेक्ट उडाण’ला भरारी
विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचा उत्साहात समारोप; कुदरी, रेंगादडी व पिपली संघांनी पटकावले विजेतेपद
आयोजक : पोलीस मदत केंद्र, पिपली (बुर्गी)
प्रतिनिधी : सुगत उराडे |
दि. १५ सप्टेंबर २०२६
पिपली (बुर्गी) : पोलीस मदत केंद्र पिपली (बुर्गी) यांच्या वतीने ‘पोलीस दादा लोरा खिडकी’ या उपक्रमाच्या माध्यमातून ‘प्रोजेक्ट उडाण’ अंतर्गत विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांना परिसरातील युवक-युवती तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या उपक्रमांतर्गत झालेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेत मौजा कुदरी संघाने प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळविले. कबड्डी स्पर्धेत मौजा रेंगादडी संघाने प्रथम क्रमांक मिळविला. तर रेला नृत्य स्पर्धेत मौजा पिपली संघाने प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपदावर आपले नाव कोरले.
विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व विजेत्या संघांचे पोलीस मदत केंद्र पिपली (बुर्गी) यांच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. ग्रामीण भागातील युवकांना क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात आपले कौशल्य सादर करण्याची संधी मिळावी, तसेच त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला पोमके पिपली (बुर्गी)चे प्रभारी PSI मा. येवले साहेब, PSI मा. मनोज खरे साहेब, मुन्ना पुंगाटी, सरपंच जवेली खुर्द, सैनुजी लेकामी पोलीस पाटील, संजय कोरचा कुंडम पोलीस पाटील, दिलीप नरोटे पोलीस पाटील यांच्यासह पोलीस मदत केंद्र पिपली (बुर्गी) येथील जिल्हा पोलीस व CRPFचे सर्व पोलीस कर्मचारी, पोमके पिपली (बुर्गी) हद्दीतील सर्व पोलीस पाटील तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘प्रोजेक्ट उडाण’च्या माध्यमातून युवकांच्या क्रीडा व सांस्कृतिक कलागुणांना प्रोत्साहन देण्याबरोबरच पोलीस आणि नागरिकांमधील सुसंवाद अधिक दृढ करण्याचा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
