घोडसुर येथे वनहक्क पट्ट्यांसाठी शेतकरी बांधव एकवटले; राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष्मण येरावार यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन
एटापल्ली (गडचिरोली):
दिनांक २६ सप्टेंबर २०२६ | तालुका प्रतिनिधी: गिरीष डी. नरोटे
एटापल्ली तालुक्यातील घोडसुर येथे परिसरातील अतिक्रमणधारक शेतकरी बांधव आपल्या हक्काचे वनहक्क पट्टे मिळवण्यासाठी एकत्र आले होते. प्रशासनाच्या ढिसाळ आणि दिरंगाईच्या कारभारामुळे परिसरातील अनेक शेतकरी अजूनही वनहक्काच्या हक्कापासून वंचित आहेत. या वंचित शेतकऱ्यांना त्यांचे न्याय्य वनहक्क पट्टे लवकरात लवकर मिळावेत, या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अहेरी विधानसभा अध्यक्ष श्रीमान लक्ष्मणजी येरावार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले.
या सभेत शेतकऱ्यांना वनहक्क दाव्यांसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे आणि संबंधित शासकीय कार्यालयांकडून पुरावे कसे मिळवावेत, याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाला निवृत्त अधिकारी श्री. वासुदेव कोडापे यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी अतिक्रमण दावे मंजुरीसाठी लागणाऱ्या तांत्रिक व कायदेशीर कागदपत्रांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून घोडसुर ग्रामपंचायतीचे प्रशासक श्री. साधुजी कोरामी, ज्येष्ठ नागरिक श्री. गजाननजी पातेवार, कारका खुर्द येथील पोलीस पाटील, श्री. लालुजी उसेंडी (कोताकोंडा), श्री. साईनाथ चटारे (सेवेची), श्री. गंगाराम ईस्टाम (कोताकोंडा) यांच्यासह परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
