आलापल्ली वनविभागाची वन्यजीव तस्करीविरोधात मोठी कारवाई
जिवंत दोन खवले मांजरे, संशयित वाघाच्या अवयवांची हाडे व दात जप्त; ६ आरोपींना वनकोठडी
आलापल्ली | दि. २७ सप्टेंबर २०२६
तालुका प्रतिनिधी : गिरीश डी. नरोटे
आलापल्ली वनविभागाच्या झिमेला उपक्षेत्रातील आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्गालगत नागमाता मंदिर परिसरात वन्यजीवांच्या अवैध खरेदी-विक्रीविरोधात वनविभागाने मोठी कारवाई केली. या कारवाईत एकूण ६ संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना न्यायालयाच्या आदेशानुसार १ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आलापल्ली वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महसूल गुप्तवार्ता संचालनालय (DRI), वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो (WCCB) तसेच उदंती-सीतानदी व्याघ्र प्रकल्प, छत्तीसगड यांच्या समन्वयाने संयुक्त सापळा रचला.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बनावट ग्राहकाची भूमिका घेत संशयितांशी संपर्क साधला. त्यानंतर दि. २६ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ९.३० वाजता नियोजित ठिकाणी वन्यजीवांच्या कथित अवैध खरेदी-विक्रीसाठी आलेल्या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणाशी संबंधित आणखी एका व्यक्तीलाही ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे आरोपींची संख्या सहा झाली.
जिवंत खवले मांजरांसह संशयित वन्यजीव अवयव जप्त
आरोपींच्या ताब्यातील साहित्याची तपासणी केली असता वनविभागाच्या पथकाला एक जिवंत प्रौढ खवले मांजर (Indian Pangolin) आणि त्याचे एक जिवंत पिल्लू आढळून आले. याशिवाय वाघाच्या अवयवांचे असल्याचा संशय असलेली ४३ हाडे आणि दोन दात, तसेच इतर संबंधित साहित्य जप्त करण्यात आले.
खवले मांजराचा समावेश वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार उच्च संरक्षण श्रेणीत करण्यात आला आहे. या प्रकरणी वन्यजीव (संरक्षण) अधिनियमातील संबंधित तरतुदींनुसार कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
अहेरी न्यायालयाचा आदेश; १ ऑक्टोबरपर्यंत वनकोठडी
ताब्यात घेतलेल्या सर्व सहा आरोपींना दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी प्रथमश्रेणी न्यायालय, अहेरी येथे हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व सहा आरोपींना दि. २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वनकोठडी मंजूर करण्यात आली आहे.
दरम्यान, वनविभागाकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून वन्यजीवांच्या कथित अवैध खरेदी-विक्रीची साखळी, जप्त करण्यात आलेल्या वन्यजीव अवयवांचा स्रोत, संभाव्य व्यवहार तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास केला जात आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास
सदर प्रकरणाचा पुढील तपास शैलेश मिना, उपवनसंरक्षक, आलापल्ली आणि एस. जी. पवार, उपविभागीय वनाधिकारी, आलापल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली एस. आर. रामगुंडेवार, वनपरिक्षेत्र अधिकारी, आलापल्ली करीत आहेत. कारवाईमध्ये आलापल्ली वनपरिक्षेत्रातील क्षेत्र सहाय्यक, वनरक्षक, वनसेवक तसेच इतर वनकर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
वन्यजीवांची अवैध शिकार व तस्करी ही जैवविविधतेसमोरील गंभीर समस्या असून अशा गुन्ह्यांविरुद्ध कारवाई अधिक प्रभावीपणे सुरू ठेवण्यात येणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. नागरिकांनी वन्यजीवांशी संबंधित कोणतीही संशयास्पद माहिती आढळल्यास ती तात्काळ वनविभागाच्या निदर्शनास आणून द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
