लसीकरणानंतर दोन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू; आरोग्य कर्मचाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी
काप्पेवंचा येथील प्रकरण; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव बालाजी गावडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
गडचिरोली प्रतिनिधी :
अहेरी : तालुक्यातील मौजा काप्पेवंचा येथे दोन महिन्यांच्या आदिम माडीया (PVTG) समाजातील बाळाचा लसीकरणानंतर मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करून, दोषी आढळणाऱ्या आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे गडचिरोली जिल्हा सचिव बालाजी गावडे यांनी केली आहे.
या मागणीसंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, काप्पेवंचा येथील सुनीता शामराव तलांडी व शामराव तलांडी यांच्या दोन महिन्यांच्या बाळाला ७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे २ वाजता आरोग्य सेविका, MPW, आशा कार्यकर्ती आणि कंत्राटी आरोग्य सेवक यांनी घरी येऊन लसीकरण केले. पालकांच्या म्हणण्यानुसार, बाळाला चार इंजेक्शन तसेच दोन प्रकारची औषधे देण्यात आली.
लसीकरणानंतर काही तासांतच बाळाची प्रकृती बिघडल्याचे पालकांनी निवेदनात म्हटले आहे. बाळ दूध घेत नव्हते व बेशुद्धीसारखी स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर त्याच रात्री सुमारे १२ वाजण्याच्या दरम्यान बाळाचा मृत्यू झाल्याचा दावा पालकांनी केला आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्काचा प्रयत्न केल्याचा पालकांचा दावा
बाळाच्या मृत्यूनंतर पालकांनी कुटुंबीय व ग्रामस्थांना माहिती दिली. तसेच आशा कार्यकर्तीला आणि आरोग्य सेविकेला माहिती देण्याचा प्रयत्न केल्याचे पालकांनी निवेदनात नमूद केले आहे. आरोग्य सेविकेने फोन उचलला नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
या घटनेनंतर ८ सप्टेंबर २०२६ रोजी राजाराम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे निवेदनात नमूद आहे. तसेच बाळाच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी अहेरी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
“निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करा”
लसीकरण आणि बाळाच्या मृत्यूमध्ये नेमका संबंध होता का, मृत्यूचे वैद्यकीय कारण काय होते आणि संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांकडून उपचार किंवा लसीकरण प्रक्रियेत कोणतीही त्रुटी झाली का, याची वैद्यकीय व प्रशासकीय पातळीवर सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बालाजी गावडे यांनी केली आहे.
“सदर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून चौकशीत दोषी आढळणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. आदिम माडीया (PVTG) समाजातील नागरिकांची संख्या मोठी असलेल्या पेरमिली परिसरातील आरोग्य सुविधांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे,” अशी भूमिका गावडे यांनी मांडली.
पेरमिली प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी
पेरमिली परिसरातील आदिम माडीया (PVTG) समाजातील नागरिकांना आरोग्य सेवा सहज उपलब्ध व्हावी, यासाठी पेरमिली प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी, अशी स्वतंत्र मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, बाळाच्या मृत्यूचे वैद्यकीय कारण आणि लसीकरणाशी असलेला संभाव्य संबंध अधिकृत चौकशी व वैद्यकीय अहवालातूनच स्पष्ट होऊ शकतो. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी प्रकरणाची पारदर्शक चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
