विकासाच्या दाव्यांना खड्ड्यांचा आरसा!; पुरसलगोंदी–आलेगा रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात
झारेवाडा–येडसगोंदी मार्गावर पावसाच्या पाण्याने रस्ता वाहून गेला; पुलिया नसल्याने ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास
🫸 Girish narote 🫷
एटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील गिलानगुडा, झारेवाडा, येडसगोंदी, आलेगा आणि पुरसलगोंदी परिसरातील रस्ते व पुलियांची दुरवस्था सध्या ग्रामस्थांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. एटापल्ली मुख्यालयापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या या भागातील रस्त्यांकडे शासन-प्रशासनाचे पुरेसे लक्ष नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
झारेवाडा ते येडसगोंदी मार्गावरील पुलियासमोरील रस्ता पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. परिसरातील अनेक ठिकाणी आवश्यक पुलिया नसल्याने पावसाळ्यात पाणी रस्त्यावरून वाहते आणि रस्त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
पुरसलगोंदी–आलेगा रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात
पुरसलगोंदी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणारा पुरसलगोंदी ते आलेगा हा महत्त्वाचा मार्ग सध्या मोठमोठ्या खड्ड्यांनी व्यापला आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने रस्त्याची अवस्था आणखी बिकट झाली असून, वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रस्त्यावर योग्य प्रकारे मुरूम टाकणे, खड्डे बुजविणे आणि पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी आवश्यक व्यवस्था करणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
‘मायनिंग सुरू, मग रस्त्याची दुरवस्था का?’
पुरसलगोंदी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात लॉर्ड्स मेटल कंपनीचे मायनिंग सुरू असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी मूलभूत सुविधांबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.
“या परिसरातील जल, जंगल आणि जमीन उद्योगासाठी आवश्यक असताना स्थानिक जनतेला चांगला रस्ता, पुलिया आणि इतर मूलभूत सुविधा मिळणार कधी?” असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
मायनिंग कंपनीकडून गेल्या ९ ते १० महिन्यांपासून रस्ता दुरुस्तीचे आश्वासन दिले जात असल्याचे ग्रामस्थ सांगतात. मात्र, अद्याप प्रत्यक्ष दुरुस्ती झाली नसल्याचा त्यांचा दावा आहे.
रॉयल्टी आणि CSR निधीचा लाभ स्थानिकांना कधी?
मायनिंगमधून शासनाला रॉयल्टी मिळते तसेच CSR निधीची तरतूद असल्याचे सांगितले जाते. मात्र, त्याचा स्थानिक मूलभूत सुविधांच्या विकासासाठी नेमका किती आणि कसा वापर होतो, याबाबत पारदर्शक माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
“मायनिंगचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू असताना स्थानिक गावांमध्ये साधा चालण्यायोग्य रस्ताही नसेल, तर विकासाचा लाभ नेमका कुणाला?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
ग्रामपंचायतीनेही तातडीने लक्ष द्यावे
रस्त्याच्या दुरवस्थेबाबत ग्रामस्थांनी ग्रामसेविका सौ. कपूरेंडी मॅडम आणि सरपंच सौ. अरुणा सडामेक मॅडम यांनी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे.
पावसाळ्यात नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता संबंधित विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून रस्ता दुरुस्ती, आवश्यक पुलिया बांधकाम, पाण्याचा निचरा आणि खड्डे बुजविण्याची कामे तातडीने हाती घ्यावीत, अशी मागणी जोर धरत आहे.
प्रशासनाच्या कार्यक्षमतेची परीक्षा
एकीकडे गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाचे दावे केले जात असताना, दुसरीकडे दुर्गम आणि मायनिंग क्षेत्रातील गावांतील नागरिकांना खराब रस्ते व पुलियांच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.
पुरसलगोंदी–आलेगा आणि झारेवाडा–येडसगोंदी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने दुरुस्ती करावी, संबंधित निधीचा वापर पारदर्शकपणे करावा आणि पावसाळ्यात वाहून गेलेल्या रस्त्याची कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी शासन-प्रशासनाकडे केली आहे.
खड्ड्यांनी विदारलेला हा रस्ता आता केवळ प्रवासाचा प्रश्न राहिलेला नसून, दुर्गम भागातील विकासकामांची प्रत्यक्ष स्थिती दाखवणारा आरसा ठरत आहे.
