माओवादमुक्त वातावरणात बुर्गी (येमली) येथे आदिवासी बांधवांसोबत पोलिसांची पहिली दिवाळी!
पोलीस दादालोरा खिडकी उपक्रमातून आदिवासी शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, महिला व विद्यार्थ्यांसोबत आनंदोत्सव; मिठाई व फटाक्यांचे वाटप करून सामाजिक सलोखा आणि शांततेचा दिला संदेश
एटापल्ली | दि. ९ नोव्हेंबर २०२६ प्रतिनिधी : सुगत उराडे
एटापल्ली : गडचिरोली जिल्ह्यात माओवादमुक्त वातावरण निर्माण होत असताना दुर्गम व अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या जीवनात आनंदाचे क्षण फुलविण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने पुढाकार घेतला आहे. याच अनुषंगाने पोलीस दादालोरा खिडकी उपक्रमांतर्गत पोलीस मदत केंद्र बुर्गी (येमली) येथे रविवार, दि. ८ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘एक दिवाळी आदिवासी बांधवांसोबत – पहिली माओवादमुक्त दिवाळी’ हा विशेष उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
या दिवाळी उत्सवात बुर्गी (येमली) पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील आदिवासी शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, महिला, शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद साजरा केला. पोलिसांनी नागरिकांमध्ये मिसळून सण साजरा केल्याने परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
मिठाई व फटाक्यांच्या वाटपाने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलला आनंद!
दिवाळी उत्सवाच्या निमित्ताने पोलीस अधिकारी व नागरिकांनी एकत्रितपणे फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी उपस्थित आदिवासी बांधव, शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना मिठाई व फटाक्यांचे वाटप करण्यात आले. पोलिसांकडून मिळालेल्या या अनपेक्षित भेटीमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. गावकऱ्यांनीही पोलिसांच्या या सामाजिक उपक्रमाचे मनापासून स्वागत केले.
शांतता, सुरक्षितता आणि विकासाचा दिला संदेश!
हा उपक्रम केवळ दिवाळी साजरी करण्यापुरता मर्यादित न ठेवता पोलिसांनी गावातील नागरिकांशी विविध सामाजिक विषयांवर संवाद साधला. गावातील शांतता व सुरक्षितता कायम राखणे, सामाजिक एकोपा टिकविणे, परस्पर विश्वास वाढविणे आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचे महत्त्व याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
दुर्गम व अतिदुर्गम भागातील आदिवासी नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांनाही सण-उत्सवांचा आनंद घेता यावा, तसेच पोलीस आणि नागरिकांमधील विश्वासाचे नाते अधिक दृढ व्हावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
माओवादमुक्त गडचिरोलीच्या दिशेने विश्वासाची नवी पहाट!
आजवर विविध आव्हानांना सामोरे गेलेल्या दुर्गम भागातील नागरिकांच्या जीवनात शांतता, सुरक्षितता आणि विकासाचे नवे पर्व सुरू व्हावे, यासाठी पोलीस दलाकडून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. बुर्गी (येमली) येथे आदिवासी बांधवांसोबत साजरी करण्यात आलेली ही पहिली माओवादमुक्त दिवाळी केवळ सणाचा आनंद देणारी ठरली नाही, तर पोलीस आणि नागरिक यांच्यातील आपुलकी, विश्वास आणि सामाजिक सलोखा अधिक मजबूत करणारा सकारात्मक उपक्रम ठरली.
माओवादमुक्त गडचिरोलीच्या दिशेने सुरू असलेल्या वाटचालीत शांतता, विकास आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारी बुर्गी येथील ही दिवाळी परिसरातील नागरिकांसाठी नव्या आशेची आणि आनंदाची पर्वणी ठरली.
