बंद शाळेला पुन्हा मिळाली शिक्षणाची संजीवनी!
CPI, AIYF आणि AISF च्या पाठपुराव्याला यश; कोसा आलेंगा येथील जिल्हा परिषद शाळा पुन्हा सुरू
शिक्षकांअभावी अनेक वर्षांपासून शाळा होती बंद; विद्यार्थ्यांची जंगलवाटेने होणारी पायपीट थांबणार
गडचिरोली | एटापल्ली | तालुका प्रतिनिधी : गिरीश डी. नरोटे
एटापल्ली : एकीकडे जिल्हा परिषद शाळा बंद पडत असताना, दुसरीकडे दुर्गम भागातील बंद पडलेली शाळा पुन्हा सुरू करण्यात यश आले आहे. ग्रामपंचायत कोहका अंतर्गत येणाऱ्या कोसा आलेंगा गावातील अनेक वर्षांपासून बंद असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अखेर सुरू झाली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI), ऑल इंडिया यूथ फेडरेशन (AIYF) आणि ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (AISF) यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याने गावातील विद्यार्थ्यांना आता गावातच शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे.
कोसा आलेंगा गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत उपलब्ध असूनही शिक्षकांच्या अभावामुळे शाळेचे कामकाज अनेक वर्षांपासून बंद होते. परिणामी, गावातील सुमारे तीन लहान विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कोहका येथील शाळेत जावे लागत होते. त्यासाठी दररोज २ ते ३ किलोमीटर अंतर जंगलातील पायवाटेने पायी पार करावे लागत होते. विशेषतः पावसाळ्यात या प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत होता.
या गंभीर समस्येकडे गावकऱ्यांनी CPIच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षासह AIYF आणि AISF यांनी प्रशासनाकडे निवेदन सादर करून कोसा आलेंगा येथील शाळेसाठी तातडीने शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी केली. संघटनांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनाने शिक्षक उपलब्ध करून दिले आणि अखेर शाळेचे कामकाज पुन्हा सुरू झाले.
“शाळा बंद पडत असताना बंद शाळा सुरू करणे, ही जनआंदोलनाच्या ताकदीची पावती!”
याबाबत CPIचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार म्हणाले की, कोसा आलेंगा येथे शाळेची इमारत आणि विद्यार्थी असतानाही केवळ शिक्षक नसल्यामुळे शाळा बंद होती. लहान विद्यार्थ्यांना दररोज जंगलातील पायवाटेने दुसऱ्या गावात शिक्षणासाठी जावे लागत होते. गावकऱ्यांनी समस्या निदर्शनास आणून दिल्यानंतर CPI, AIYF आणि AISF यांच्या माध्यमातून प्रशासनाकडे ठामपणे मागणी करण्यात आली. अखेर आमच्या पाठपुराव्याला यश आले असून शाळा पुन्हा सुरू झाली आहे. हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या हक्काचा आणि जनआंदोलनाच्या ताकदीचा विजय आहे.
ते पुढे म्हणाले की, दुर्गम आणि आदिवासीबहुल भागातील प्रत्येक गावातील मुलांना त्यांच्या गावातच प्राथमिक शिक्षण मिळाले पाहिजे. शिक्षणासाठी लहान विद्यार्थ्यांना जंगलातील पायवाटेने दुसऱ्या गावात जाण्याची वेळ येणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे प्रशासनाने शाळांमध्ये आवश्यक शिक्षक आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
कोसा आलेंगा येथील बंद शाळा पुन्हा सुरू झाल्याने गावकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांची दररोजची पायपीट थांबणार असून त्यांच्या शिक्षणाचा मार्ग आता अधिक सुलभ होणार आहे.
दुर्गम भागातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये आणि शिक्षकांच्या अभावामुळे कोणत्याही शाळेचे शैक्षणिक कामकाज बंद पडू नये, यासाठी CPI, AIYF आणि AISF यांचा लढा यापुढेही सुरूच राहील, अशी भूमिका कॉ. सचिन मोतकुरवार यांनी व्यक्त केली.
