कापसाला दुष्काळाच्या झळा; उत्पादन घटण्याची भीती
गुड्डीगुडम परिसरात पावसाच्या अनियमिततेचा फटका; शेतकऱ्यांना लाखोंचा आर्थिक फटका बसण्याची शक्यता
अहेरी | गुड्डीगुडम प्रतिनिधी : रमेश बामणकर
अहेरी तालुक्यातील गुड्डीगुडम व राजाराम परिसरात यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडण्याची चिन्हे दिसत आहेत. दुष्काळसदृश परिस्थिती आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे कापूस पिकाच्या वाढीवर परिणाम झाला असून, यंदा एकरी उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांनी कापूस लागवडीसाठी बियाणे, खते, कीटकनाशके, मजुरी आणि मशागतीवर मोठ्या प्रमाणात खर्च केला. मात्र पावसाने वारंवार खंड दिल्याने पिकाला आवश्यक ओलावा मिळू शकला नाही. परिणामी कापसाची वाढ खुंटणे, फुलपाती व बोंडांची संख्या कमी होणे तसेच बोंडांची अपेक्षित वाढ न होणे, अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. याचा थेट परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता आहे.
गुड्डीगुडम परिसरात मोठ्या प्रमाणात कापूस लागवड केली जाते. मात्र या भागातील शेतकऱ्यांसमोर कापूस विक्रीचाही गंभीर प्रश्न उभा आहे. परिसरात शासकीय आधारभूत कापूस खरेदी केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी गोंडपिपरी किंवा आष्टी येथे जावे लागते. त्यामुळे वाहतूक खर्चाचा अतिरिक्त भार सहन करावा लागतो. त्यातच खासगी व्यापाऱ्यांकडून अपेक्षित भाव मिळत नसल्याच्या तक्रारीही शेतकरी करीत आहेत.
अहेरीत आधारभूत कापूस खरेदी केंद्र सुरू करा!
अहेरी तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन अहेरी येथे शासकीय आधारभूत कापूस खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) गुड्डीगुडम शहर प्रमुख संदीप सिडाम यांनी केली आहे. स्थानिक पातळीवर खरेदी केंद्र सुरू झाल्यास शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च वाचेल आणि त्यांना शासकीय दराने कापूस विक्रीची सुविधा उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले.
पिकासाठी पाण्याची कसरत; उत्पादनाबाबत चिंता
यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे कापसाला आवश्यक ओलावा मिळाला नाही. पिकाला पाणी देण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. अहोरात्र मेहनत करूनही अपेक्षित उत्पन्न मिळेल की नाही, याची चिंता सतावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव मिळणे आवश्यक आहे, अशी भावना शेतकरी उमेश पेंड्याला यांनी व्यक्त केली.
उत्पादन घटले तर भाव वाढणार; मात्र शेतकऱ्यांच्या पदरात काय?
कापसाचे उत्पादन घटल्यास बाजारातील आवक कमी होऊन दरात वाढ होण्याची शक्यता असली, तरी त्याचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना कितपत मिळेल, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. एकीकडे एकरी उत्पादन घटण्याची भीती, तर दुसरीकडे बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि काढणीचा वाढता खर्च यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यता आहे.
शासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज
गुड्डीगुडम व राजाराम परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा कृषी विभागाने प्रत्यक्ष बांधावर जाऊन आढावा घ्यावा. पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करून पात्र शेतकऱ्यांना नियमानुसार मदत द्यावी. तसेच अहेरी येथे आधारभूत कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
