सिरोचा दिनांक 13/5/2026
संपादक,:– सुरेश एम तिपट्टीवार
सिरोंचा तालुका हा तालुका शेतीप्रधान म्हणून ओळखला जातो. येथील शेतकरी वर्षभर राबराब राबून विविध प्रकारची पिकं घेतात. मिरची, धान, मका, मुग, बरबटी, कापूस, टरबूज अशी अनेक पिकं मोठ्या प्रमाणावर तालुक्यात घेतली जातात. सुपीक जमीन आणि मेहनती शेतकरी यामुळे सिरोंचा तालुक्याची शेती जिल्ह्यात विशेष मानली जाते.
शेतकरी रात्रंदिवस शेतात घाम गाळून पिकं उभं करतात, पण बाजारात त्या पिकांना योग्य भाव मिळत नाही. प्रशासनाकडून फक्त धान खरेदी केली जाते, तर इतर पिकांसाठी कोणतीही ठोस खरेदी व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.
मिरची, मका, मुग, कापूस यांसारखी पिकं मातीमोल भावात विकावी लागत आहेत. अनेक शेतकऱ्यांना आपला माल घेऊन शेजारच्या तेलंगणा राज्यात जावं लागतं. तेथे बाजार मिळत असला तरी वाहतूक खर्च आणि दलालांच्या अडचणींमुळे शेतकऱ्यांच्या हातात अपेक्षित नफा राहत नाही.
शासन आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सिरोंचा तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहेत. धानासोबत इतर पिकांचीही शासकीय खरेदी केंद्र सुरू करावीत, साठवणूक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि शेतमालाला हमीभाव द्यावा, अशी मागणी आता शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.
“शेतकरी जगला तरच देश जगेल,” असे म्हणत सिरोंचा तालुक्यातील शेतकरी आपल्या हक्काच्या न्यायाची अपेक्षा शासनाकडून करत आहेत.
